देवेंद्र गुरसाळे उर्फ पिंटू शेठ असे जायला नको होते


देवेंद्र गुरसाळे उर्फ पिंटू शेठ असे जायला नको होते


समाजामध्ये वावरत असताना विविध स्वभावाचे माणसं आपल्या संपर्कात येतात. प्रत्येकाकडे काही ना काही गुणदोष असतात. मित्रांच्यावर निस्सीम प्रेम करणारे सच्चे मित्रही त्याहून अधिक चांगले, सुसंस्कृत असतात.आपला उद्योग सांभाळत अनेक मित्राशी स्नेह जपणे तसे अवघड काम. मात्र काही व्यक्तींच्या स्वभावामध्ये "मित्रत्वाचा ऋणानुबंध कायम" ठेवण्याचा प्रयत्न करणारे सखे-सोबती मित्र हे वेगळेच असतात. जीवनामध्ये आई-वडिलांच्यानंतर शिक्षकांना महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर जीवन प्रवासामध्ये मित्रचा वाटा महत्त्वाचा असतो. कारण मित्रांच्या सहवासाने जीवनाचे अनेक चढ-उतार पार केले जातात. ज्याला जिवलग मित्रांची साथसोबत असेल अशा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतात किंवा कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मित्रच मित्रासाठी धावून येतात. म्हणूनच "ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी" असेही म्हटले जाते.


देवेंद्र गुरसाळे ऊर्फ पिंटू शेठ म्हणून सर्वश्रुत सर्वपरिचित आणि मोठा मित्र वर्ग सांभाळणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असत.प्रत्येक मित्राच्या हाकेला धावून जाणारे पिंटू शेठ आता आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. ही खंत व दुःख अनेक मित्रांच्या मणी आहे.पिंटू शेठ जीवन जगले ते आनंदी, उत्साही आणि स्वतःच्या मनाला साजेसे जगले. समाजामध्ये खुल्या मनाने वावरले. मात्र पिंटू शेठ यांच्याबाबत नियत्तीच्या मनात जे होते ती दुर्दैवी घटना घडली. अन सर्वांना दुःख देऊन गेले. भल्या पहाटे व्यायामासाठी गेले ते परत आलेच नाहीत. हे दुःख संपूर्ण गुरसाळे कुटुंबियांबरोबर मित्रांच्या मनाला वेदना देऊन गेले. कारण पिंटू शेठ यांचे जाण्यासारखे वयही नव्हते. अशी अचानक त्यांची एक्झिट होईल असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा सुरुवातीपासून पिंटू शेठ यांचा छंद होता. मग तो कोणताही गडकिल्ला असो, त्या ठिकाणी जाऊन पर्यटन करावे हा त्यांचा स्वभाव होता.


कराडला लागून सदाशिवगड, आगाशिवगड, वसंतगड यासह अनेक छोटे-मोठे गडकिल्ले आहेत. याठिकाणी पिंटू शेठ यांनी भ्रमंती केली आहे. अवघड असणारा वासोटा किल्ला ही त्यांनी अनेक वेळेला पादाक्रांत केला आहे. गड-भ्रमंती करताना त्यांच्याबरोबर मोठा मित्रपरिवार नेहमी असत. घारेवाडी येथील धुळोबा डोंगरावर पर्यटनाला जाताना त्यांच्यासोबत अनेक मित्र सोबतीला होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते ते विपरीत घडले आणि सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला नेहमीच मदत करणारे कराड शहरातील सुप्रसिध्द सोन्या-चांदीचे व्यापारी देवेंद्र गुरसाळे उर्फ पिंटू शेठ असे अचानक एक्झिट घेतील असे कोणाच्या मनी आले नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धनासाठी नेहमीच आपला हात मदतीसाठी पुढे करणारे आता पिंटू शेठ या मोहिमेमध्ये दिसणार नाहीत. वास्तविक कोण कोणाची जागा भरून काढत नाही. तशीच पिंटू शेठ यांची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे सत्य नाकारता येणार नाही.


पिंटू शेठ हे नेहमी हसतमुख असणारे व दिलदार मनाचे व्यक्तिमत्व नेहमीच मित्रांच्या गोतावळ्यात रमणारे, मित्रांसोबत हास्यविनोद करून जीवनाकडे सकारात्मक पाहण्याचा दृष्टिकोन असणारे. हळव्या मनाचे होते. दैनंदिन जीवनामध्ये आपण स्वीकारलेला व्यवसाय प्रामाणिक, इमानेइतबारे करण्यासाठी त्यांचा पहिल्यापासूनच प्रयत्न राहिला, तो शेवटच्या क्षणापर्यंत.वास्तविक पाहता सोन्या-चांदीच्या व्यवसायांमध्ये विश्‍वास महत्त्वाचा असतो. तो पिंटू शेठ यांनी जपला होता. अनेक ग्राहक त्यांच्या शब्दावर व विश्वासावर डोळे झाकून सोन्या-चांदीचे व्यवहार करीत होते. कोणत्याही ग्राहकाच्या मनामध्ये किंतु - परंतु निर्माण होणार नाही याची दक्षता पिंटू शेठ घेत असत.व्यवसायावर अढळ निष्ठा कशी असावी, हा गुण अनन्यसाधारण असा पिंटू शेठ यांच्याकडे होता. कारण कामानिमित्त बाहेर गावी गेल्यानंतर रात्री-अपरात्री परत घरी आल्यानंतर सकाळी व्यवसाय सुरु करण्याच्या वेळेत हजर असत. प्रवासाचा कंटाळा अथवा व्यवसायाकडे दुर्लक्ष करण्याचा मुळात त्यांचा स्वभावच नव्हता.


देवेंद्र गुरसाळे हे व्यक्तिमत्व हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक सर्वांचा अखेरचा निरोप घेतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. यामुळे पिंटू शेठ यांचे सर्वांना सोडून जाणे गुरसाळे कुटुंबीयांना व मित्र परिवाराला मोठा धक्का देणारी घटना आहे. गुरसाळे ज्वेलर्स म्हणून कराडमध्ये सोन्या-चांदीचे व्यापारी असणारे गुरसाळे कुटुंबातील देवेंद्र गुरसाळे हे मुख्य बाजारपेठेत सोन्याचांदीचा व्यवसाय करीत. अशोकराव गुरसाळे यांचे देवेंद्र गुरसाळे हे छोटे बंधू असून व्यवसायांमध्ये विश्वासहर्ता निर्माण करून शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांशी त्यांचा सकारात्मक सुसंवाद होता. रविवार पेठेतील कोष्टी गल्ली येथील शिवाजी मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. गड-किल्ल्यांची भ्रमंती करण्याची त्यांना आवड होती. मंगळवारी पहाटे मित्रांसमवेत घारेवाडी (ता. कराड) जवळच्या धुळोबा देवस्थान डोंगरावर गेले. डोंगरावर मंदीरापर्यंत सर्वजण पोहचले. देवाचे दर्शन घेतले आणि तहान लागल्याने ते पाणी पिण्यासाठी बसले. अखेरचे पाणी पिले आणि त्याच ठिकाणी कोसळून पडले. त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंटू शेठ यांनी या उपचाराला फारसा प्रतिसाद दिला नाही आणि इहलोकातला आपल्या कार्यकाळ संपविला. 


देवेंद्र गुरसाळे ऊर्फ पिंटू शेठ आपण असे अचानक जायला नको होता. कारण तुम्हाला अजून जीवनात बऱ्याच गोष्टी करावयाच्या होत्या. संसार असा अर्ध्यावर सोडून जाणे हे सर्वांच्या मनाला वेदना देणारे आहे. कोणाच्या ओल्या किंवा सुक्या पाचोळ्यावर पाय न देणारे देवेंद्र गुरसाळे उर्फ पिंटू शेठ यांच्यावर नियतीनेही असा सूड उगवायला नको होता. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सर्वांना मदतीसाठी धावून जाणारे पिंटू शेठ यांना नियतीने असे अचानक घेऊन जाणे योग्य नव्हते मात्र "आले नियतीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना" असेच दुःखी अंतकरणाने म्हणावे लागेल.


गोरख तावरे
9326711721