चांगले काम करणाऱ्या पतसंस्थाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


चांगले काम करणाऱ्या पतसंस्थाच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील


सातारा (राजसत्य) महाराष्ट्राच्या विकासात सहकार चळवळीचा मोठा सहभाग आहे. सहकार चळवळीमुळेच शेतकऱ्यांमध्ये आर्थिक परिवर्तन झाले आहे. ज्या सहकारी पतसंस्था चांगल्या काम करत  आहेत, अशा पसंस्थांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहिल, असे प्रतिपादन सहकार  व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशनच्या रौप्य महोत्सवी निमित्त पतसंस्थांसाठी एकदिवशीय अधिवेनाचे आयोजन आज येथील शाहू कलामंदिर मध्ये करण्यात आले होते. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील, रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, मानद सचिव अंजली पवार, संचालक विनोद कुलकर्णी, नेरेंद्र पाटील, शिरीष चिटणीस यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


या फेडरेशनला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत, याचा अभिमान असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, आज राज्यामध्ये अनेक पतसंस्थांचे चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. या संस्था समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम करीत आहेत. अशा संस्थांमुळेच खासगी सावकारीला आळा बसलेला आहे. राज्यात सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात असून यांच्या उन्नतीसाठी शासन नेहमीच पाठीशी राहिल, असे आश्वासनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी शेवटी दिले.


पतसंस्थांनी आर्थिक शिस्त लावण्याबरोबर होणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवले तर संस्थां कधीही अडचणीत येणार नाही.  प्रत्येक कर्ज प्रकरणाची काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे.  आपले व्यवहार हे आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित ठेवून जास्तीत जास्त छोटे छोट कर्ज वितरणाबरोबर स्वनिधी वाढविण्यावर भर द्यावा. पतसंस्थांचे भविष्य चांगले असून ग्राहकांना जास्ती जास्त सेवा व सुविधा पुरवाव्यात, असे जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी या एक दिवसीय अधिवेशनात सांगितले.


यावेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या पतसंस्थांचा  पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच  यशवंत या स्मरणिकेची प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी विनोद कुलकर्णी, प्रकाश पाटील, सुनिल जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन शिरीष चिटणीस यांनी केले. या अधिवनेशनास जिल्ह्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.