कीर्तनकेसरी करंदीकर बुवा यांनी ज्ञानपरंपरेचा वारसा समाजापर्यंत पोहोचविला -अनंत दीक्षित....कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन


कीर्तनकेसरी करंदीकर बुवा यांनी ज्ञानपरंपरेचा वारसा समाजापर्यंत पोहोचविला -अनंत दीक्षित....कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन



पुणे - कीर्तनाव्दारे समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कीर्तनकेसरी श्री ल के करंदीकर बुवा यांनी ज्ञानपरंपरेचा वारसा समाजापर्यंत पोहोचविला असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षित यांनी केले. कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर बुवा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी श्री. दीक्षित बोलत होते.


                    श्रमिक पत्रकार प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्री अनंत दीक्षित हे होते. यावेळी कीर्तनकार श्री. मोरेश्वरबुवा जोशी- चऱ्होलीकर व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर नीहारा प्रकाशनच्या डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, श्रीमती कल्पना करंदीकर, सौ. सरिता करंदीकर व कीर्तनकार श्री. हरिभाऊ तथा नारायण करंदीकर हे उपस्थित होते.  दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतिगंध या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार श्री. न. चिं. अपामार्जने यांचा सत्कार करण्यात आला.


ज्येष्ठ पत्रकार श्री. अनंत दीक्षित म्हणाले, बार्शी शहराने शाहीर अमर शेख पं. सी आर व्यास व कीर्तनकेसरी ल. के. करंदीकर ही तीन अनमोल रत्ने दिली. करंदीकर बुवा यांची वाणी ओजस्वी होती. अध्यात्माची वाटचाल सर्वसामान्यांसाठीही सुकर असल्याचे करंदीकर बुवा यांनी पटऊन दिले.  सर्वसामान्यांप्रमाणे अगदी श्रमिक वर्गही बुवांचे कीर्तन तन्मयतेने ऐकत असत हे विशेष. बुवांनी आपल्या कीर्तनाद्वारे लोकशिक्षण व प्रबोधन केले. महाराष्ट्रातील ज्ञानपरंपरा अखंडपणे पुढे नेण्याचे महान कार्य कीर्तनकार ल. के. करंदीकर यांनी केल्याचेही श्री. दीक्षित यांनी सांगितले.



कीर्तनकार मोरेश्वर बुवा जोशी- चऱ्होलीकर म्हणाले, कीर्तनकार हा केवळ कलाकार नसतो तर त्याने संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनकार म्हणून जगणे अपेक्षित असते. कीर्तनात अनेक नवे प्रवाह येत आहेत मात्र कीर्तनाचा मूळ अध्यात्मिक गाभा कायम राहिला पाहिजे असेही श्री जोशी यांनी सांगितले.


संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, कीर्तन ही सर्वांगसुंदर कला तर आहेच परंतु ते समाजप्रबोधनाचे अत्यंत सशक्त आणि प्रभावी असे माध्यमही आहे. कीर्तनकेसरी ल के करंदीकर यांनी समाजप्रबोधनाचा हा वसा जपल्याचेही श्री देखणे यांनी सांगितले. कीर्तनकेसरी करंदीकर बुवा यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना डॉ अशोक गोडबोले म्हणाले, करंदीकर बुवा हे व्यासंगी व अलौकिक अध्यात्मिक उंची गाठलेले कीर्तनकार होते. बुवांचा संगीत आणि संस्कृतचाही मोठा व्यासंग होता. श्री. श्यामसुंदर मुळे म्हणाले, करंदीकर बुवा शिक्षक म्हणून अतिशय प्रेमळ आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे होते. कीर्तनसेवा करतानाच ते खऱ्या अर्थाने पारमार्थिक जीवन जगले असेही श्री मुळे यांनी सांगितले.


नीहारा प्रकाशनच्या डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी म्हणाल्या, कीर्तनकेसरी करंदीकर बुवा हे बार्शीचे वैभव होते. स्मृतीगंध स्मरणिकेच्या माध्यमातून करंदीकर बुवा यांच्या स्मृती व विचारधन जतन करत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सौ. सरिता करंदीकर म्हणाल्या, करंदीकर बुवा यांचे जीवन संतांप्रमाणेच प्रेरणा देणारे आहे. त्यांनी आयुष्यभर निस्पृहपणे व निश्चयपूर्वक  कीर्तनसेवा केल्याचे सौ करंदीकर यांनी सांगितले. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. भगवंत नेने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्री. हरीभाऊ मोडक यांच्या हस्ते गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनसा करंदीकर आणि कीर्तनकार हरिभाऊ करंदीकर यांनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कुमारी मुग्धा मोडक, वेदांगी करंदीकर, अवंतिका बागुल, सायली शेटे यांनी नृत्य सादर केले.


प्रास्ताविक श्री. हेरंब करंदीकर व सौ. पल्लवी करंदीकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. अभय करंदीकर यांनी केले तर आभार सौ. अनया करंदीकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता 'रचा प्रभू तूने यह ब्रम्हांड सारा' या भैरवीने झाली. यास तबलासाथ श्री सुहास शेटे यांनी तर हार्मोनियमची साथ श्री. प्रसाद सहस्त्रबुद्धे यांनी केली. यावेळी कीर्तनकार नंदू महाराज रणशूर, कवी श्री. मुकुंदराज कुलकर्णी, अन्य मान्यवर व करंदीकर बुवांप्रती स्नेह असलेले श्रोते उपस्थित होते.