तानाजींच्या वंशजाला आर्थिक हातभार, रायबा मालुसरेंना अतुल भोसलेंची मदत


तानाजींच्या वंशजाला आर्थिक हातभार, रायबा मालुसरेंना अतुल भोसलेंची मदत


कराड - छत्रपती शिवाजी महाराज यांनी "गड आला, पण सिंह गेला" असे उद्गार काढून ज्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला, त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज असणारे रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी डॉ. अतुल भोसले यांनी हातभार लावला.


शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ. अतुल भोसले, प्रमुख सल्लागार प्रा विनोद बाबर, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितलताई मालुसरे, इतिहास अभ्यासक प्रा. अरूण घोडके, शिवकालीन शस्त्र संग्रहक गिरीशराव जाधव, प्राचार्य डॉ.बी.एस.साळुंखे उपस्थितीत होते.सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, राहुल जाधव, उमेश भोसले, नरेंद्र मुळीक, सचिन माने, चंद्रजित पाटील यांनी ऐतिहासिक कवड्याच्या माळेचे दर्शन घेतले. 


नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट वंशज असणाऱ्या रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी साताऱ्यातील कराडच्या शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी 50 हजार रुपयांची मदत दिली.कराड तालुक्यातील शेतकरी प्रसारक शिक्षक मंडळच्या माध्यमातून शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट बाराव्या वंशज शीतल शिवराज मालुसरे यांना सन्मानित करण्यात आले, तर रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी अतुल भोसले यांनी दिलेली 50 हजारांची मदत शीतल मालुसरे यांनी स्वीकारली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार, प्रेरणेवर काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी छत्रपतींसोबत काम केलेल्या मावळ्यांच्या वंशजाना मदत केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केली. अतुल भोसले यांनी केलेली मदत अनमोल आहे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही. रायबाचे शिक्षण आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे.’ अशा भावना शीतल मालुसरे यांनी व्यक्त केल्या.


‘मी सोबत आणलेली समुद्र कवड्यांची माळ घरात ठेवून लोकांच्या उपयोगी पडणारी नाही. परंपरागत सासूकडून सूनेला दिली जाणारी ही माळ, दागिन्याच्या पेटीत ठेवण्यापेक्षा सर्वांना तिचं दर्शन घडत असेल, तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’ असं शीतल मालुसरे म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात असलेली ही माळ शीतल मालुसरेंनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दर्शनासाठी आणली होती. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर आधारित ‘तान्हाजी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमामुळे तानाजींची शौर्यगाथा दृकश्राव्य माध्यमातूनही सामान्यांपर्यंत पोहचली आहे.