स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील नगरपालिका सज्ज
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सातारा जिल्हय़ाचे अग्रस्थान कायम राहील यासाठी प्रत्येक मुख्याधिकारी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. इतकेच काय शिवसेनेचे नेते, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा असल्यामुळे त्यांचे लक्ष स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेकडे आहे. राज्य शासनाकडून आवश्यक ती मदत देण्याची हमी त्यांनी दिली आहे. सातारा जिल्हा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये अग्रस्थानावर असला पाहिजे, यासाठी प्रत्येक मुख्याधिकार्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत अशी अपेक्षा मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या अनुषंगाने नगरपालिका व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट, चांगले, दर्जेदार काम होऊ लागली आहेत. यामध्ये लोकसहभाग दिसून येत आहे लोकसहभागाशिवाय स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. यामुळे लोकांना स्पर्धेमध्ये सामावून घेण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. स्वच्छतादूत म्हणून नागरिकांना यामध्ये सामावून घेतले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये नगरपालिका व नगरपंचायतीनी सहभाग नोंदवला असून सातारा जिल्ह्यात एकही महापालिका नाही. गत वर्षांमध्ये एक लाख लोकवस्ती आतील नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये देशात कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळविला. तो क्रमांक पुन्हा प्राप्त करण्यासाठी कराड नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन सातारा जिल्हा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अग्रक्रमांक ठेवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावा अशा सूचना केल्या आहेत. दरे (महाबळेश्वर) या त्यांच्या गावातील निवासस्थानी मुख्याधिकारी यांची बैठक झाली आहे. सातारा जिल्हय़ातील ९ नगरपालिका व ७ नगरपंचायती आहेत.नव्याने ७ नगरपंचायत निर्माण झाल्या असून यापूर्वी याठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार चालत होता. सध्या नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे ७ नगरपंचायतीनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. ९ नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा जाहीर झाल्यापासून प्रतिवर्षी यामध्ये सहभाग घेत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सातारा जिल्हय़ातील नगरपालिका व नगरपंचायतींनी चांगले काम केले आहे. 2020 सालच्या स्पर्धेतही सातारा जिल्हय़ाचे अग्रस्थान कायम ठेवावा अशा सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांचे मंत्रालय पातळीवर जे प्रलंबित प्रस्ताव आहेत. याबाबत मंत्रालय स्तरावर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेसंदर्भात बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्याची हमी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होणार असून प्रश्न लवकर मार्गी लागतील.कराड, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी,वाई, फलटण, रहमतपुर, मलकापूर,म्हसवड या नगरपालिका असून लोणंद, मेढा, पाटण, वडूज, कोरेगाव, खंडाळा, दहिवडी या नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती आहेत. दरम्यान तीन ते चार ठिकाणी एकच मुख्याधिकारी दोन नगरपालिका अथवा नगरपंचायतीचा कारभार पाहत आहेत. सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका विभाग आहे. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, फलटणचे प्रसाद काटकर, पाटणचे अभिषेक परदेशी, महाबळेश्वर, पाचगणीच्या अमिता दगडे, वाई, मेढाच्या विद्या पोळ, फलटण, लोणंदचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर मलकापूर मुख्याधिकारी संजीवनी दळवी, रहमतपुर विनायक औंधकर यांच्यासह सर्वच मुख्याधिकारी स्वच्छ सर्वेक्षण कामाला अग्रक्रम देत आहेत. स्थानिक राजकारणाचा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेवर कोणताही परिणाम होऊ न देता, प्रत्येक मुख्याधिकारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाबरोबर घेऊन लोकप्रतिनिधींची सुसंवाद साधून स्पर्धेचे सकारात्मक कामकाज करीत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेकरिता नगरपालिका व नगरपंचायत येथील स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी हातात हात घालून काम होणे अपेक्षित असून हे सातारा जिल्ह्यात दिसून येत आहे. 2019 सालच्या स्पर्धेत कराड नगरपालिकेने 1 लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी यावर्षीही कराडने आपला प्रथम क्रमांक कायम राखावा यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.स्वच्छ सर्वेक्षण 2020 ला सामोरे जाण्यासाठी जिल्हय़ातील नगरपालिकांनी जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक शहरातील कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया याबरोबरच प्रत्येक चौकाचे सुशोभिकरण, शहरातील विद्युत व्यवस्था सुरळीतपणे सुरु ठेवणे, भिंती रंगून समाजप्रबोध व स्वच्छतेचा संदेश देणे, टाकाऊ वस्तूपासून चित्रकृती निर्माण करणे, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी व प्रबोधनात्मक गाण्याची धून ऐकविणे, शहरातील प्रत्येक घरातील कचरा व्यवस्थित वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करणे, बागांचे सुशोभीकरण, इमारतींचे रंगरंगोटी करणे, सफाई कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड, स्वच्छतेबाबत शहरांमध्ये प्रबोधनात्मक फलक लावले आहेत. स्वच्छतेच्या अनुषंगाने फेसबुक पेज, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुपद्वारेही प्रसार व प्रचार केला जातोय. गत दोन वर्षात स्पर्धेत सातारा जिल्हय़ातील नगरपालिकांनी चांगली कामगिरी केली होती. यावर्षीच्या स्पर्धेतही नगरपालिका चांगली कामगिरी करतील असा विश्वास निर्माण झाला आहे.