"सुंदर कराड"चे अखेर झाले विद्रुपीकरण कराडकरांचे मोठे आर्थिक नुकसान; कराड बंद


"सुंदर कराड"चे अखेर झाले विद्रुपीकरण
कराडकरांचे मोठे आर्थिक नुकसान; कराड बंद


(गोरख तावरे)


कराड - "स्वच्छ कराड, सुंदर कराड" मोहिमेअंतर्गत कराडमध्ये अतिशय चांगले काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होतो म्हणून सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर गालबोट लागले.रस्त्यावरील अतिक्रमण काढता काढताच व्यवसायिक दुकानावरील फलक हटवण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने राबवल्याबद्दल कराडकर संतप्त झाले असून कराड नगरपालिकेने "सुंदर कराड" चे विद्रुपीकरण केले आहे. व्यापाऱ्यांनी बेमुदत कराड बंदची हाक दिली असून आज कराड बंद होते. पोलीस व नगरपालिका प्रशासनाला मोर्चाद्वारे व्यापाऱ्यांनी निवेदन दिले.


अतिशय शिस्तबद्धरित्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. वास्तविक वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे हातगाडे, टपरी, खोके अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आले. दरम्यान शुक्रवारी दुपारपासून अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने व्यवसायिक गाळ्यांवरील फलक हटविण्यास प्रारंभ केला.अपवादात्मक काही फलक मोठे होते ते हटवत असतानाच जे रीतसर कायदेशीर फलक आहेत. त्याच्यावर जेसीपींने ठोका घालून फलक अस्ताव्यस्त करण्यात आले. यामुळे कराडच्या मुख्य बाजारपेठेला अवकळा आली असून संपूर्ण बाजारपेठचे विद्रुपीकरण झाले आहे.


दरम्यान अतिक्रमण मोहीम राबवत असताना काही ठिकाणी काहींचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून पथक पुढे गेल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर काही बड्या धेंड्यांचे अतिक्रमणाला धक्का लावला नाही, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कराड शहरातील सर्व लहान-मोठे व्यापाऱ्यांनी आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी स्वतःहून व्यवसायीक फलक व नगरपालिकेला अडथळा वाटेल असे अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली आहे.संपूर्ण कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर पत्रा, काचा, फलक, दगड, विटा, माती असे पडल्याने कराडमध्ये मोठी दंगल झाल्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे.


कृष्णा नाका ते चावडी चौक ठिकाणच्या अतिक्रमण काढताना मोहिमेमध्ये काही अज्ञात लोक घुसले आणि त्यांनी सरसकट सर्व फलक व पायऱ्या काढण्यासाठी दबाव टाकला. यामुळे मोहिमेतील कर्मचाऱ्यांना आपण काय करतो हेच लक्षात आले नाही. हेतुपुरस्सर अनेक व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान करण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष व्यवसायिक गाळेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. दरम्यान व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने काही जणांनी "बरे झाले, झाले ते" कारण कराडच्या सुखदुःखात हे व्यापारी कधीच सहभागी होत नाहीत, अशी नाराजीही अनेकांनी व्यक्त केले आहे.


स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर असलेल्या कराड शहरातील अतिक्रमण काढताना आपणच स्वच्छ कराडला गालबोट लावत आहोत अथवा स्वच्छ कराडला विद्रुपीकरण करत आहोत, याचे भान मात्र नगरपालिका प्रशासनाला राहिले नाही. शनिवारी सकाळपासून कराड शहरासह ग्रामीण भागातील लोक अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अतिक्रमण मोहीम अशी कशी सुरू आहे ? असा प्रश्न विचारला जात होता. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर हातोडा घालताना नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीला अडथळा नसणाऱ्या व्यवसायिक गाळ्यांवर जेसीपी चालवल्यामुळे कराडकर संतप्त झाले आहेत.


अतिक्रमण काढताना पक्षपातीपणा नाही - यशवंत डांगे


वाहतुकीला अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोणताही पक्षपातीपणा केला जात नसून अतिक्रमण मोहीम ही सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.


पोलिस बंदोबस्त कायम देणार - सुरज गुरव


नगरपालिका प्रशासन जोपर्यंत अतिक्रमण मोहीम चालू ठेवेल तोपर्यंत आम्ही त्यांना पोलिस बंदोबस्त देणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी सांगितले. 


कायदा-सुव्यवस्थेची दक्षता घेतोय - बी. आर. पाटील


अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, याची दक्षता आम्ही घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.


माझे अतिक्रमण काढले त्याचेही काढा 


आपले नुकसान झाल्यामुळे अनेक जण इतरांच्याकडे बोट दाखवण्याची स्पर्धा आता सुरू झाली आहे. माझे अतिक्रमण काढले तर समोरच्याचे ही काढा, असा प्रशासनाकडे आग्रह धरणाऱ्यांची यांची संख्या वाढते आहे