खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे विविध रस्त्यांसाठी 16 कोटी 85 लक्ष मंजूर .....पाल ते काशीळ रस्त्याच्या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर


खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे विविध रस्त्यांसाठी 16 कोटी 85 लक्ष मंजूर .....पाल ते काशीळ रस्त्याच्या कामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर


कराड -  सातारा लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने 16 कोटी 85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती संपर्क कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


पाल (ता.कराड) येथे प्रसिध्द खंडोबा देवस्थान असून आहे. या ठिकाणी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व अन्य राज्यातील लाखो भाविक, पर्यटक भेट देत असतात. तसेच यात्रा कालावधीत देवस्थानला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. देवस्थानकडे येण्यासाठी काशीळ ते पाल या मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र हा रस्ता अरुंद असून अत्यंत खराब झाल्याने प्रवाशांसाठी धोकादायक बनला होता. या मार्गावर सततची होणारी कोंडी व मार्गाची झालेली दुरावस्था यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करून सुधारणा करण्यात यावी अशी मागणी कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराजदादा पाटील यांनी खा. श्रीनिवास पाटील यांचेकडे केली होती. त्यानुसार  महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प 2020-21 मधून पाल ते काशीळ रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


याशिवाय कराड तालुक्यातील शेळकेवाडी ते पाटीलवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्याच्या कामासाठी 1 कोटी 60 लाख, पाडळी ते केसे रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण कामासाठी 2 कोटी, वडोली निळेश्वर ते पार्ले रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण कामासाठी 2 कोटी 50 लाख, उंडाळे ते पाटीलवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरण कामासाठी 2 कोटी 75 लाख तसेच जावली तालुक्यातील मरडमुरे फाटा ते मरडमुरे रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.


विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. मकरंद पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले असल्याचे माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.