श्री नाईकबा मंदिराला टाळे ठोकले दर्शन बंद, 18 मार्चला यात्रेचा निर्णय होणार 


श्री नाईकबा मंदिराला टाळे ठोकले
दर्शन बंद, 18 मार्चला यात्रेचा निर्णय होणार 


कराड - ढेबेवाडी परिसरातील श्री नाईकबा देवस्थानची यात्रा यावेळी भरवली जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी सदरचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून मंदिराला टाळा ठोकण्यात आला असून दर्शन बंद करण्यात आले आहे. यात्रेसाठी मुंबईवरून मोठ्या प्रमाणात भाविक येतात ते या ठिकाणी येऊ नयेत. यासाठी यात्रा कमिटी 18 मार्च रोजी निर्णय घेणार आहे.


ढेबेवाडी खोऱ्यातील बहुतांश गावातील नागरिक कामधंद्यासाठी मुंबईस्थित आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे श्री नाईकबा देवस्थान यात्रेसाठी सर्व चाकरमानी गावाकडे येऊन जत्रेमध्ये सहभाग घेऊन देवाचे दर्शन घेतात. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या सूचनेनुसार कर्नाटक महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी-जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील सुप्रसिद्ध नाईकबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून सोमवारी सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारास टाळे लावण्यात आले आहे.


दरम्यान, नाईकबा देवाची यात्रा 29 व 30 मार्च या दिवशी
होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना पाहता यावर्षी नाईकबा यात्रा होणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान नाईकबा देवस्थान कमिटी स्थानिक ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांची 18 मार्च रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी
वर्तवली आहे.