इराणमध्ये अडकलेले पश्चिम महाराष्ट्रातील 44 नागरिक मायदेशी परतले..... राजस्थान येथे विलगिकरण कक्षात रवानगी....खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश


इराणमध्ये अडकलेले पश्चिम महाराष्ट्रातील 44 नागरिक मायदेशी परतले..... राजस्थान येथे विलगिकरण कक्षात रवानगी....खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कराड - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 44 नागरिक शनिवारी रात्री उशिरा मायदेशी परतले. त्यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान 'त्या' नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे प्राथमिक तपासणीतून स्पष्ट झाले असून सुरक्षिततेच्या कारणावरून त्यांना राजस्थान येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.



सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील 44 उमराह (हज) यात्रेकरू 21 फेब्रुवारी 2020 रोजी महाराष्ट्रातून इराकसाठी निघाले होते. विमान 21 फेब्रुवारी 2020 रोजी इराणची राजधानीत तेहरान शहरामध्ये दाखल झाले. मात्र, पुढील विमानसेवा रद्द झाल्यामुळे सदर 44 यात्रेकरू इराणमध्ये अडकून पडले होते. त्यांच्याबरोबर साद ट्रॅव्हल्स, कोल्हापूरचे एस. एस. मोमीन हे सुध्दा होते. मोमीन यांनी साताराच्या सामाजिक कार्यकर्ता अंजली कुलकर्णी यांच्यामार्फत खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधून, आम्हा भारतीयांना इराणमधून सुखरूप मायदेशी परत आणण्याची विनंती खा. पाटील यांचेकडे केली होती.

मोमीन यांनी संपर्क केल्यानंतर खा. श्रीनिवास पाटील यांनी मोमीन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार त्यांना समजले होते की, तेहरानमध्ये अडकलेल्या 44 लोकांना परत आणण्यासाठी मोमीन यांनी 28 फेब्रुवारी 2020 रोजी परतीचे विमान तेहरान ते मुंबई आरक्षित केले होते. परंतु, दुर्दैवाने विमानाचे उड्डाण रद्द झाल्याने उमराह यात्रेकरूंना तेथेच अडकून पडावे लागले होते. मोमीन यांच्याकडून ही माहिती समजल्यानंतर खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकांना परत मायदेशात आणण्यासाठी जलद हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांनी ई-मेलद्वारे परराष्ट्र मंत्रालयाला पत्र दिले. तसेच दि. 2 मार्च रोजी पार्लमेंट मध्ये समक्ष भेट घेऊन खा. श्रीनिवास पाटील यांनी हज यात्रेकरूंना मदत करावी, असे लेखी पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा एकदा खासदार श्रीनिवास पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून त्याविषयी विनंती केली होती.

इराणमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन नांगरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यांना विमानाद्वारे भारतात पाठविण्यात आले. शनिवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे दिल्ली येथील इंदिरा गांधी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या वैद्यकिय तपासण्या करण्यात आल्या. विमानातील सर्व प्रवाशांना राजस्थान मधील जैसलमेर येथे विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती उत्तम असून कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खा.श्रीनिवास पाटील यांचे मानणार आभार

खा. श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ते 44 नागरिक सुखरूप परतले असून त्यांनी खा. श्रीनिवास पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. तर 14 दिवसानंतर गावी आल्यानंतर समक्ष भेटून खा. श्रीनिवास पाटील यांचे आभार मानणार असल्याचे मोमीन यांनी फोनवरून सांगितले.