संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा : राज्यपाल
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. यास्तव शासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मी सर्व नागरिकांना करीत आहे.
गुढी पाडव्याचा मंगल सण आपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. ‘घरी रहा आणि सुरक्षित रहा ! नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो’ अशा सर्वांना शुभेच्छा देतो. युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.