कुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट
मुंबई - राज्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, खासदार सुनिल तटकरे, आमदार रोहीत पवार, पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशनचे पदाधिकारी सी.वसंतकुमार, श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्धव अहिरे, डॉ.प्रसन्न पेडगांवकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. केदार म्हणाले, कुक्कुटपालन व्यवसाय सध्या अडचणीच्या स्थितीतून जात आहे. मागील एक महिन्यापासून समाज माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाविषयीच्या अपप्रचारामुळे ग्राहक वर्गाने चिकनकडे पाठ फिरवल्यामुळे कुक्कुटपालकांचे नुकसान झाले आहे. याकरिता ऊर्जा विभागाला विजबील भरण्याकरिता तीन महिन्याची सवलत देणे, माणसांना खाण्याकरिता अयोग्य असलेले धान्य कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या करांविषयी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
या व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असल्याने त्यांना राज्य शासनाकडून मदत करण्याविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडून मदत मिळविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने पशुसंवर्धन विभाग हा विषय गांभीर्याने घेत असून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.