कोरोना व्हायरससाठी उपाययोजना राबवा - खा. श्रीनिवास पाटील....दिल्ली येथे आयुष मंत्रालयाच्या बैठकीत सूचना ; औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढविण्यासाठी केले आवाहन


कोरोना व्हायरससाठी उपाययोजना राबवा - खा. श्रीनिवास पाटील....दिल्ली येथे आयुष मंत्रालयाच्या बैठकीत सूचना ; औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढविण्यासाठी केले आवाहन


कराड - कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नाका - तोंडाला लावण्यात येणा-या अँटीव्हायरस मास्कची उपलब्धता वाढवण्यात यावी अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली.


नवी दिल्ली येथे संसद भवन मध्ये ६२ नंबरच्या सभागृहात बुधवारी आयुष मंत्रालयाच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भात करत असलेल्या उपाययोजना तसेच मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी खासदारांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांच्या अन्य खासदार, आयुष मत्रालंयाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


या बैठकी दरम्यान सध्या देशातील विविध शहरामध्ये कोरोना व्हायरसचा उपद्रव वाढू नये. या संसर्गाला पायबंध घालण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून कोणकोणत्या आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रश्न खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केले. खबरदारीचा उपाय म्हणून नाकाला आणि तोंडाला लावायचे अँटीव्हायरस मास्क असतात. ते सध्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याची माहिती वाचनात आली. त्याचे उत्पादन जास्तीत जास्त करता यावे यासाठी अशा मास्क उत्पादकता मार्फत खात्रीने काही प्रयत्न करता येतील का ? ज्यामुळे त्याची उपलब्धता वाढेल. याबाबत सरकारने विचार विनिमय करावा अशी सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी केली. याशिवाय संभाव्य आपत्ती व निर्मुलनाबाबत काही महत्वाच्या सूचनाही यावेळी त्यांनी मांडल्या. 


यावर सर्व विभागाच्या सचिवांना याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. भारत सरकारने कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी अॅडवायजरी जाहीर केली असल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिली.


वनौषधींचे उत्पादन घेण्यासाठी शेतक-यांना प्रेरीत करावे : खा. पाटील 


दरम्यान शेतकऱ्यांच्या मार्फत औषधी वनस्पतींचे उत्पादन, त्याची हमीभावाने खरेदी, साठवणूक आणि वितरण व्यवस्था सरकारने निर्माण केली पाहीजे. त्याशिवाय सामान्य शेतकरीवर्ग औषधी वनस्पती लागवड करणार नाही. जंगलातून वनऔषधी वनस्पती गोळा करण्यापेक्षा त्याची शेती केल्यास औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळू लागला की, अधिकाधिक उत्पादन देण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतील. यासाठी आयुष मंत्रालयाने पुढाकार घ्यावा अशी सूचना खा. पाटील यांनी केली. या सूचनेची दखल घेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिले.