कराडमधील प्रशासन दक्ष....नागरिकांनी घराबाहेर पडू नये आवाहन.......जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी नको, याची खबरदारी घेतली जातेय

सतत


कराडमधील प्रशासन दक्ष....नागरिकांनी घराबाहेर पडू नये आवाहन.......जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी नको, याची खबरदारी घेतली जातेयकराड - सध्या कराडमध्ये संचारबंदी सुरू असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी किराणा मालाचे दुकान, बेकरी, मेडिकल भाजीपाला सुरू आहे. दरम्यान याठिकाणी ही गर्दी होऊ नये. याची दक्षता प्रशासनाने घेतली असून कराड नगरपालिकेने भाजी मंडई परिसरांमध्ये दोन भाजी विक्रेत्यांच्या मध्ये अंतर असावे यासाठी मार्किंग केले आहे.


कराड नगरपालिकेचे प्रशासन, महसूल विभागाचे प्रशासन, त्याचबरोबर वैद्यकीय विभागाने कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर येऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. दुचाकीवरून अथवा पायी कराड शहरातून फिरणाऱ्या लोकांची पोलीस कसोशीने चौकशी करून कोणत्या कामासाठी ते बाहेर आले आहेत, याची खातरजमा करीत आहेत.दरम्यान काही काम नसताना शहरात फेरफटका मारणाऱ्या हुल्लडबाज तरुणांना चोप दिला जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की, प्रत्येकाने आपापल्या घरातच राहावे, घराबाहेर शक्यतो पडू नये. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, अनावश्यक घराबाहेर पडू नये असे सांगितले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे हे आपल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाबरोबर संपूर्ण कराड शहर परिसरातील लागून असणाऱ्या छोट्या गावांवर नजर ठेवून आहेत.नगरपालिकेच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वे सुरू असून मुंबई-पुणेसह बाहेरगावाहून आलेल्या लोकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत.