कृषी सिचाई योजनेतंर्गत धरणाच्या कामांना मिळणार गती - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची माहिती


कृषी सिचाई योजनेतंर्गत धरणाच्या कामांना मिळणार गती - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची माहिती


कराड - सातारा जिल्हयातील जलसिंचनाच्या कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या धरण प्रकल्पासह,इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांवरील रस्ते, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना व प्रलंबीत असणाऱ्या विकासकामांना कालबध्द गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे.


सातारा जिल्हयातील पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून यामध्ये वांग मराठवाडी, तारळी आणि मोरणा गुरेघर या तीन मध्यम धरण प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार असून तारळी धरण प्रकल्पातील धुमकवाडी, आवर्डे, कोंजवडे, बांबवडे व तारळे  या पाच उपसा जलसिंचन योजनांची कामे मुदतीत पुर्ण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे.


कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा जिल्हयातील पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून तीन मध्यम धरण प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पातून नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांच्या ५० मीटर उंचीच्या वरील डोंगरपायथ्यापर्यंतचे १०० टक्के जमिन क्षेत्रास धुमकवाडी, आवर्डे,कोंजवडे,बांबवडे व तारळे येथे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्यास शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देवून निधीही दिला आहे. या योजनांची कामे संथगतीने सुरु आहेत त्यास गती देण्याची गरज आहे. तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या कालव्यामुळे डोंगरपायथ्यापर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येत नसल्याने या क्षेत्राला उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याकरीता सदर प्रस्ताव शासनाचे तत्वत: मान्यतेकरीता सादर करण्यात आला असून ही बाब व्याप्ती बदलामध्ये समाविष्ट आहे. यास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे गरजेचे आहे. 


सातारा जिल्हयातील डोंगरी आणि दुर्गम भागातील जिल्हा परीषदेच्या अख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर होवून या ग्रामीण रस्त्यांची कामे होणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्या अख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांसदर्भात सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी संयुक्त बैठक घेवून या ग्रामीण रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावा अशा सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत.