शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजाराम पाटील, डॉ. झकेरिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त व्याख्यान
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम पाटील व ज्येष्ठ विचारवंत व माजी मुख्यमंत्री डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधिमंडळाने राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करण्या-या व्याख्यानाचे दि.11 मार्च 20 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या मान्यवरांनी देशाच्या व राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे व त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विधिमंडळाच्या पाचव्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात बुधवार दिनांक ११ मार्च २०२० रोजी सायंकाळी ४.०० वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील-चाकूरकर, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गो-हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड् अनिल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी माधवराव गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे हे व्याख्याते म्हणून लाभणार आहेत.