कोरोना बाधित रुग्ण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला... 11 लोक एकत्रित गुन्हा दाखल
कराड - सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामिण भागातील असल्याने प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आता या रुग्णांमधील एक रुग्ण डोहोळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डे गावातील एका डोहोळी जेवणाच्या कार्यक्रमास तांबवे येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसह ११ लोक एकत्रित आल्याने वसंतगड येथील तलाठी यांच्या फिर्यादीवरून कराड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक २६ मार्च २०२० रोजी दुपारी २ च्या सुमारास संजय रघुनाथ निकम (वय -४६) व सुनिल रघुनाथ निकम (वय- ४० दोघेही रा. साकुर्डी ता. कराड ) यांनी त्यांच्या घरात त्यांच्या भाच्याच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. त्या कार्यक्रमांस स्वत:चे घरातील ८ लोक, भाचा, त्याची पत्नी तसेच तांबवे येथील कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण असे ११ लोक एकत्रीत जमले होते.
दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमाचे कोणीही नियोजन करुन नये, लोकांना एकत्रीत आणु नये याबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून सुरक्षेचे अंतर न ठेवल्याप्रकरणी गावकामगार तलाठी वसंतगड (ता. कराड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संजय निकम व सुनिल निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्री. पानवळ करीत आहेत.