कराड अर्बन बँकेला 59.20 कोटींचा ढोबळ नफा - डॉ. सुभाष एरम


कराड अर्बन बँकेला 59.20 कोटींचा ढोबळ नफा - डॉ. सुभाष एरम


                      (गोरख तावरे)


कराड - मार्च 2020 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता बँकेचा एकूण ठेवव्यवहार रु.2754 कोटी  तर कर्जव्यवहार रु.1752 कोटी झाला असून एकूण व्यवसाय रु.4506 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला रु.59.20 कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु.24.05 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.


चालू वर्षाच्या या आकडेवारीचे अवलोकन केले असता, सुरुवातीच्या काळात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत महापुराने झालेले प्रचंड नुकसान, पी.एम.सी. बँकेच्या पतनामुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर लागलेले प्रश्नचिन्ह, त्यानंतर येस बँकेवरील निर्बंध आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्राविषयी निर्माण झालेला संभ्रम, रिझर्व्ह बँकेच्या दूरगामी परिणाम करणार्‍या विविध परिपत्रकीय सूचना आणि बँकिंगच्या दृष्टीने महत्वाच्या असणार्‍या शेवटच्या मार्च महिन्यात आलेले कोरोना विषाणूचे संकट या सर्वांवर यशस्वीपणे मात करत गेल्या वर्षीचा रु.9.77 कोटींचा संचित तोटा संपूर्णपणे निरंक करून रु.14.28 कोटींचा निव्वळ करोत्तर नफा मिळविला आहे आणि सर्वच क्षेत्रातील प्रतिकूल असणार्‍या पार्श्वभूमीवर बँकेला मिळालेले हे यश निश्चितच अभिनंदनीय आहे; मार्च 2020 च्या आकडेवारीवरून बँकेच्या सभासद, ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवला असून बँकेच्या सर्वांगीण प्रगतीत सर्व सेवकांनी कष्टपूर्ण योगदान दिले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी दिली.


चालू आर्थिक वर्षात अतिशय मोठे आव्हान ठरलेल्या वसुलीच्या आघाडीवरदेखील उत्तम कामगिरी करीत जुन्या एन.पी.ए. खात्यांतून जवळपास रु.100 कोटींची वसुली करण्यात यश मिळाले आहे. एकूण 62 शाखांपैकी 23 शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के असून बँकेच्या निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण 7.28% इतके राहिले आहे.


बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) 16.59 टक्के राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे.


नुकत्याच उद्भवलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने सर्व शाखा आणि ए.टी.एम.सेवा अविरत कार्यान्वित ठेवल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती किंवा आजारी व्यक्तींना घरपोच सेवा दिली जात आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिकांची नेमकी आर्थिक गरज ओळखून नियमित कर्जदारांना तत्काळ अधिकर्ष सवलत दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहे मार्च, एप्रिल व मे 2020 या महिन्यांचे कर्जहप्ते भरण्यासाठी कर्जदारांना विश्रांती कालावधी देऊ केला आहे. त्याचप्रमाणे ठेवींदारांना घरबसल्या सेवा देण्यासाठी एस.एम.एस. किंवा ईमेलद्वारे मुदत संपणार्‍या ठेवींचे नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांनी डिजीटल सेवा जसे एन.ई.एफ.टी., आर.टी.जी.एस., पॉईंट ऑफ सेल, ई-कॉम अशा सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी त्यांना प्रोत्साहित केले आहे.


बँकेच्या या वाटचालीत अर्बनकुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव आणि संचालक मंडळाचे योगदान आहे, त्याचप्रमाणे सेवकवर्गानेदेखील घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे. टीमवर्कच्या भावनेतून कार्यरत राहिले तरच स्वप्नवत कार्य देखील सिद्धीस जाते या उक्तीनुसार बँकेची वाटचाल सुरू आहे आणि बँकेची ही शतकोत्तर वाटचालही अशीच देदिप्यमान पद्धतीने चालू राहील असा विश्वास अध्यक्ष डॉ.सुभाष एरम यांनी व्यक्त केला.