कराडच्या सुरक्षितेसाठी राबविला जाणार भिलवाडा पॅटर्न.....नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांची समिती करणार काम....जीवनावश्यक वस्तूंसह औषधे मिळणार घरपोच


कराडच्या सुरक्षितेसाठी राबविला जाणार भिलवाडा पॅटर्न.....नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांची समिती करणार काम....जीवनावश्यक वस्तूंसह औषधे मिळणार घरपोच


कराड - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आता कराडमध्ये राबवला जाणार "भिलवाडा पॅटर्न"या पॅटर्नमुळे कराडकरांना जीवनावश्यक वस्तूंसह औषधे घरपोच दिली जाणार आहेत. कोणतेही कारण देऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत.


कराड शहरासह १३ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून 23 एप्रिलपासून या भागात शंभर टक्के लॉकडाऊन आहे. सहा दिवस रुग्णालय वगळता शहरातील सर्व सेवा ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर किराणावस्तू व भाजीपाला याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे 1 मे पासून कराड शहरात घरपोच किराणा व भाजीपाला राबवण्यात येणार आहे. कराड शहरातील सर्व 33 नगरसेवकांच्या मदतीने ही योजना भिलवाडा, बारामती पॅटर्नच्या धर्तीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्वतयारीची बैठक मंगळवारी सायंकाळी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन पार पडली.


इन्सिडेंट कमांडर कमांडर तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर.पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, सौरभ पाटील, सभापती विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, हणमंत पवार, फारुक पटवेकर यांच्यासह कराड नगरपालिकेचे अधिकारी, पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.


कराड परिसरातील १३ गावांमध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे एक लाख लोकसंख्या असणाऱ्या कराड शहरात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कराडसह लगतच्या गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर केला असून 23 एप्रिल पासून शंभर टक्के लॉक डाऊन करण्यात आला आहे. गेले सहा दिवस घरपोच दूध वगळता कोणत्याही गोष्टीची सवलत देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर किराणा वस्तू व भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिक याची मागणी करू लागले आहेत.त्यामुळे एक मेपासून घरपोच किराणा वस्तू व भाजी-पाला घरपोच देण्यात येणार आहे. याचे नियोजन नगरसेवकांकडे देण्यात आले असून त्यात या प्रभागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नागरिकांना घरपोच किराणा व भाजीपाला द्यायचा आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.


कोरोनचा प्रादुर्भाव लक्षात घेता एक मेपासून पुढील आठ दिवस तसेच त्यानंतरच्या काळात पुढील निर्णय होईपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. यात गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ, चटणी अशा आठ किराणा वस्तू एकत्रितपणे किट स्वरूपात नागरिकांना घरपोच देण्यात येणार आहेत. मागणीप्रमाणे त्याचे पैसे नागरिकांनी द्यावयाचे आहेत. शिवाय ही योजना यशस्वी झाल्यानंतर भाजीपालाही याच पद्धतीने कीट स्वरूपात देण्यात येणार आहे. रास्त भावाने वस्तू मिळणार असून त्याचा काळाबाजार रोखणे शक्‍य होणार आहे. कराड शहराचे 14 प्रभाग असून त्यातून प्रत्येकी दोन किंवा तीन नगरसेवक निवडून आले आहेत. त्या-त्या प्रभागात नगरसेवकांनी स्वयंसेवकांच्या मदतीने घरपोच सेवा देणारी यंत्रणा उभी करायची आहे यात औषधांचाही समावेश आहे.


मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रारंभी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी योजनेचे स्वरूप समजावून सांगितले. त्यानंतर नगरसेवकाने त्यांच्या शंका मांडल्या. त्यास उत्तरे देण्यात आली. प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी या योजनेचे स्वरुप सांगत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी घरातच थांबावे. त्यांना वस्तू घरपोच करण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे शहरात भाजीपाला विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी घरपोच भाजीपाला आणि किराणा देण्यात येणार आहे. नागरिकांनी घरात घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी प्रशासन ज्या पद्धतीने सांगेलं, त्या पद्धतीने ही योजना शहरात राबवण्यासाठी सर्व नगरसेवक सहकार्य करतील , अशी ग्वाही दिली. या योजनेस मूर्त स्वरूप आल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून केली जाणार आहे.