"देवदुता"सारखे धावले पालकमंत्री बाळासाहेब पाटील....ट्रॅव्हल्स मालकाचा तीन दगडाच्या चुलीवर उदरनिर्वाह सुरू


"देवदुता"सारखे धावले पालकमंत्री बाळासाहेब पाटील....ट्रॅव्हल्स मालकाचा तीन दगडाच्या चुलीवर उदरनिर्वाह सुरू


कराड - कोरोनाचे संकट सर्वांच्या डोईवर असताना अनेकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईस्थित एक ट्रॅव्हल्सधारक मालक व त्याचा ड्रायव्हर असाच मुंढे (ता. कराड) येथे अडकला आहे. कोणावर कधी, कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना त्यांना सदर ट्रॅव्हल्स मालक चालकाची माहिती समजताच तात्काळ ते घटनास्थळी पोचले आणि संबंधितांची विचारपूस केली. दरम्यान "देवदुता"सारखे पालकमंत्री बाळासाहेब पाटील धावून आल्याची प्रतिक्रिया राजू मोरे यांनी व्यक्त केले आहे.


मुंढे (ता. कराड) येथे विमानतळ परिसरातील बावडेकर मसाला शेजारी श्री रामेश्वर ट्रॅव्हल्सचे मालक चालक राजू मोरे यांना पालकमंत्री बाळासाहेब पाटील प्रत्यक्ष भेटले आणि त्यांची अडचण समजून घेतली. आर्थिकमदत व जीवनावश्यक वस्तूंचे तात्काळ मदत करावी अशी सूचना मुंढे येथील महंमद आवटे यांना केली.पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची सूचना मिळताच तात्काळ राजू मोरे यांना गहू, तांदूळ, डाळ, ज्वारी, तेल, साखर, चहापावडर, तूरडाळ, मूग डाळ कांदा बटाटा चटणी आणि सर्व प्रकारचा मसाला किमान एक महिना पुरेल इतका देण्यात आला आहे.


राजू शंकर मोरे हे मूळचे वाई तालुक्यातील असून सध्या ते दिवा (जि. ठाणे) येथे राहतात.त्यांची स्वतःची ट्रॅव्हल्स असून स्वतः चालक आहेत. कराड ते मुंबई असा नेहमी त्यांचा प्रवास सुरू असतो. राजू मोरे यांना पत्नी व तीन मुली आहेत. 21 मार्च रोजी मुंबईहून राजू मोरे हे प्रवासी ट्रॅव्हल्स घेऊन सकाळी सहा वाजता कराडला आले. दरम्यान 22 मार्च रोजी एक दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला. दरम्यान 21 तारखेलाच पूर्ण महाराष्ट्र बंद करण्यात आला. 23 मार्चला सायंकाळी नऊ वाजता गाडी भरून परत मुंबईला जायचे असे नियोजन करून राजू मोरे निवांत होते. दरम्यान लॉकडाऊन वाढवीण्यात आला. यामुळे स्वतः जवळचे असणारे काही पैसे घरखर्चासाठी पत्नीकडे मुंबईला पाठविले आणि स्वतःजवळ दीड हजार रुपये ठेवले. आगाशिवनगर येथील सोमनाथ पवार हे राजू मोरे यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्याकडून दोन किलोचा गॅस घेतला. तो आठ दिवस वापरला आणि नंतर गॅस संपला. यामुळे तीन दगडांची चूल करून याठिकाणी अन्न शिजवून ते खाऊ लागले.


दरम्यानच्या 30 एप्रिल अखेर लॉकडाऊन वाढल्यामुळे राजू मोरे यांच्याकडे असणारे पैसे संपले. आता पुढे करायचे काय ? असा त्यांच्यापुढे प्रश्न पडला होता. सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा त्यांना काही व्यक्तींकडून मोबाईल नंबर मिळाला. राजू मोरे यांनी सद्यपरिस्थितीत त्यांच्यावर बेतलेल्या कटू प्रसंगाची कहाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घातली. 13 एप्रिल रोजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना त्यांनी मुंढे (ता. कराड) येथे राजू मोरे आपल्या ट्रॅव्हल्स गाडीसह मुक्कामी असलेल्या ठिकाणी भेट देऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन असणारी अडचण समजून घेतली आणि तात्काळ त्यांना आर्थिकमदत व जीवनावश्यक वस्तूची पूर्तता करून दिली.


राजू मोरे हे तीन दगडावर चूल मांडून दोन वेळचे जेवण करून खात असताना त्यांना गॅसची व्यवस्था करतो. असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. मात्र राजू मोरे यांनी "साहेब" दिले ते पुरे झाले. मला आता गॅस नको, चुलीवर करून मी खातो असे सांगितले. अडचणीच्या काळात देवदुतासारखे पालकमंत्री बाळासाहेब पाटील माझ्या मदतीला धावून आले. मला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती. ती सहज दूर केली. इतकेच काय तर मी जिथे राहतो, ती परिस्थिती पाहिल्यानंतर फोन करून पालकमंत्री बाळासाहेब पाटील चौकशी करतात. त्याचबरोबर अंघोळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय केली ? असे त्यांनी माझी चौकशी केली असता, बावडेकर मसाला येथे माझी व्यवस्था झाली आहे. असेही राजू मोरे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना ख्यालीखुशाली सांगितल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.