कराडच्या बचत गटांकडून मास्कचे उत्पादन... स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा - स्मिता हुलवान


कराडच्या बचत गटांकडून मास्कचे उत्पादन... स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावावा - स्मिता हुलवान


कराड - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी जगभरात सर्व स्तरांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. मास्क, व्हेंटिलेटर, सॅनिटायजरच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेच्या पाच महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. शहरात गोरगरीब लोकांना मदतीसाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. या संस्थांनी बचत गटांचे मास्क खरेदी करून मदतकार्यात त्याचे वाटप करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी केले आहे.


सौ. स्मिता हुलवान गेली तीन वर्षे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पाहत आहेत. या काळात या कमिटीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. सध्या कोरोना विषाणूंमुळे लॉकडाऊन करण्यात आला असून बचत गटांसमोरही आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत पालिकेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पाच बचत गटांने प्राथमिक स्तरावर मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. बचत गटांनी मास्क उत्पादित करावेत, यासाठी सभापती स्मिता हुलवान व गणेश जाधव यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार रिद्धी, मैत्री, प्रज्ञा, हरिओम व विघ्नहर्ता या पाच महिला बचत गटांनी मास्कचे उत्पादन सुरू केले आहे. सद्यस्थितीत सुमारे दीड हजार मास्क त्यांनी तयार केले आहेत. मात्र बचत गटांना समोर मार्केटिंगची समस्या आहे.


सध्या गोरगरीब व उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी मदतकार्य मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मदत कार्यातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी या बचत गटांकडून मास्क माफक दरात खरेदी करावेत. त्यामुळे बचत गटांच्या कार्याला चालना मिळेल. शहरात सुमारे शंभर बचत गट आहेत. या बचत गटांकडून ज्यादा उत्पादन करणे शक्य आहे. त्यामुळे दानशुरांनी या योजनेस हातभार लावावा, असे आवाहन सभापती स्मिता हुलवान व पालिकेच्या दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक गणेश जाधव यांनी केले आहे.