महाराष्ट्र भाजपचे तंत्रज्ञानाच्या मदतीने महात्मा फुले यांना अनोखी आदरांजली
मुंबई - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना आज तंत्रज्ञानाची मदत घेत महाराष्ट्र भाजपाने महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीदिनी अनोखी आदरांजली अर्पण केली. सुमारे अडीच लाखांवर नागरिक, कार्यकर्ते या अनोख्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आज संपूर्ण जग कोरोनाला तोंड देत असताना, आपले जीवन मात्र थांबलेले नाही. असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी असते, फक्त ज्ञानाचा प्रकाश असावा लागतो. असाच ज्ञानप्रकाश ज्यांनी सर्वांमध्ये जागविला, त्या महात्मा जोतिबा फुले यांना आज अभिवादन करण्यासाठी राज्यातील प्रमुख भाजपानेते झूम अॅपच्या माध्यमातून एकत्र जोडले गेले होते आणि ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांशी जोडले गेले. एखाद्या सामान्य कार्यक्रमाप्रमाणेच हा कार्यक्रम झाला. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्याच नेत्यांनी आहे त्याठिकाणी महात्मा फुले यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण केली. विजयराव पुराणिक यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमुख भाषण यावेळी झाले.
व्ही. सतीशजी, चंद्रकांतदादा पाटील, एकनाथराव खडसे, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण, डॉ. संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, संजय उपाध्याय हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता पुढचा कार्यक्रम 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा होणार आहे. त्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते हे देवेंद्र फडणवीस असतील. भाजपा महिला आघाडीने 25 लाख मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला असून, मास्कवाटपाचे महत्त्वाचे उद्दिष्ट हे त्यादिवशी साध्य करण्यात येईल.