"क्वारंटाईन" केलेल्यांच्या व्यथा व अनुभव-

"क्वारंटाईन" केलेल्यांच्या व्यथा व अनुभव-


क्वारंटाईन' होणं म्हणजे काय? क्वारंटाईन होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. स्वत:चा संपर्क इतर सर्वांपासून काही कालावधीसाठी बंद करणं. वैद्यकीय आपत्कालिन परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णाला क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाते. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणे म्हणजेच क्वारंटाईन होणं. क्वारंटाईला 'मेडिकल आयसोलेशन' असंही म्हटलं जातं.


क्वारंटाईन का केलं जातं? कोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे."खोकल्यापासून बाहेर आलेले पार्टिकल्स 6 फूटापर्यंत असलेल्या व्यक्तीला संसर्ग करु शकतात. सहा फूटाअंतर्गत व्यक्ती असेल तर त्याला संसर्ग होऊ शकतो हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास त्यांचा संपर्क इतर कुणाशी झाल्यास संसर्ग वाढू शकतो. म्हणून त्रास होत असलेल्या व्यक्तीने वेगळं राहणं गरजेचं आहे."


तर अशा मोठ्या प्रमाणावर क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना ज्या जवळपासच्या शाळा,कॉलेज वा इमारतीमध्ये बंदिस्त केले जाते.त्या ठिकाणी किमान आवश्यक सोयी सुविधा पोहोचवणे स्थानिक प्रशासनाने जरूर पाहिले पाहिजे.परवा एका भिवंडीच्या मुलीचा व्हिडिओ आला होता. तिची आई कोरेना पॉझीटिव्ह असल्याने त्यांना एका शाळेत क्वारंटाईन केले होते.ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते त्या ठिकाणी काहीही सोयी सुविधा नव्हत्या.


या क्वारंटाईन केलेल्यांना अगदी हॉटेल सारख्या सोयी सुविधा देणे अपेक्षा करणे चुकीचे आहे पण किमान पिण्यासाठी पाणी व पुरेसे जेवण व इतर शौचालय सारख्या सुविधा असणे आवश्यक आहे. या मुलीने पिण्यासाठी पाणी मागितले तर तिला सांगण्यात आले जेवताना जेवढे पाणी मिळेल तेवढेच त्यानंतर पाणी देता येणार नाही.जर आणखी हवे असेल ते बेसीनचे पाणी प्या......मग स्वच्छतेचा व या क्वारंटेईन चा बोजवारा उडला नाही तर नवलच.


तिला घशामध्ये थोडा त्रास होत होता तर विनंती करूनही लवकर तिला दवाखान्यात नेले नाही.शेवटी एक अम्ब्युलन्स मधुन तिला दुरवरच्या दवाखान्यात नेले.तिथे बर्याच वेळाने तिची तपासणी केल्यानंतर.... तिने परत जेथुन तिला आणण्यात आणले त्याच ठिकाणी सोडण्यास सांगितले.मात्र तीला परत सोडण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही.हॉस्पीटलचा स्टाफ बोलला की आम्हाला परत सोडण्याचा आदेश नाही.तिने 108 या नंबरवर अनेक वेळा फोन करूनही फोन उचलला गेला नाही.त्या हॉस्पीटल मार्फत तिला सांगण्यात आले की तुम्ही पब्लीक ट्रान्सपोर्टने परत जा...ती सांगतीय की आम्ही क्वारंटाईन आहोत...पब्लीक ट्रान्सपोर्टने प्रवास कसा करू...बर वाहने तरी कुठे चालु आहेत...शेवटी ती मुलगी चालत चालतच दुरचा पल्ला पार करून परत तिच्या आईजवळ पोहोचली.


हा अनुभव य़ेथे सांगायची गरज एवढीच वाटली की जसे आपण बाहेरच्या गरजु लोकांना अन्न धान्य पोहोचवणेसाठी काळजी घेतोय...अनेक सामाजिक संस्था यासाठी मदत करताना दिसत आहेत.तसेच या क्वारंटाईन केलेल्या लोकांना किमान बेसीक गरजा पुर्ण होतील एवढे तरी लक्ष दिले जावे हि माफक अपेक्षा ठेवण गैर आहे काय.


असाच एक अनुभव कोकणातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकाने सांगितला ..पुरेशी सोयी सुविधा नसलेल्या अशाच एका ठिकाणी संबंधित क्वारंटाईन केलेल्या रूग्णाला रोजचे अन्न देताना लांबुनच थाळी देऊन ती काठीने सरकवली जात होती. या ठिकाणी मुलभुत सुरक्षा व्यवस्थेची साधने नव्हती,पीपीई कीट तर नव्हतेच... त्यामुळे दवाखान्यातील स्टाफ घाबरूनच या लोकांना लांबुनच पाणी व अन्न सारख्या सुविधा देत होता.जसे आपण कुत्र्याला लांबुन खाय़ला घालतो त्या धर्तीवर हा प्रकार म्हणजे अत्यंत क्लेषदायक आहे.


त्यामुळे या क्वारंटाईन केलेल्या लोकांना वाळीत टाकल्याप्रमाणे वागणुक न देता आरोग्याशी संबंधित आवश्यक सेवा सुविधा पुरवणे व या आरोग्यसेवकांनी ही स्वताची काळजी घेऊनच जीव धोक्यात न घालता कामकाज करावे अपेक्षित आहे.स्थानिक प्रशासनाने या क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी किमान मुलभुत सेवा सुविधा देता येणे शक्य आहे का याचाही वरचेवर आढावा घेऊन त्याप्रमाणे सुधारणा कराव्यात असे वाटते.


# संतोष देसाई, कराड