पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले पकमोडे दामप्त्यांला अभिनंदनाचे लेखी पत्र


पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले पकमोडे दामप्त्यांला अभिनंदनाचे लेखी पत्र
 
 वाशिम :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संकटामुळे संपुर्ण देशामध्ये संचारबंदी करण्यात आली असल्याने सध्या सर्व कामे ठप्प असताना  मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन पत्नीच्या मदतीने २१ दिवसात कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता घराच्या अंगणात विहीर खुदाई करुन पाण्याची सोय करणाऱ्या वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गांवातील पकमोडे या दामप्त्यांचे वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी लेखी पत्र देवून अभिनंदन केले असून त्यांच्या या कष्टाचे कौतुक केले आहे.


         वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे संचारबंदीच्या काळात वाशिम जिल्हयातील प्रत्येक घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून आहेत तसेच येथील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता तत्पर आहेत. संचारबंदीच्या काळात सर्व कामे ठप्प असताना वाशिम जिल्हयातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गांवातील गवंडी काम करणारे गजानन पकमोडे या  व्यक्तींने सध्या गवंडीकाम बंद असल्यामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करुन पत्नीच्या मदतीने  २१ दिवसात कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता घराच्या अंगणात चक्क विहिर खोदण्याचे काम केले असल्याची बातमी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आलेनंतर त्यांनी तात्काळ पकमोडे या दामप्त्यांच्या या कामांचे कौतुक करण्याकरीता व त्यांचे अभिनंदन करणेकरीता लेखी पत्र दिले आहे.


 या पत्रामध्ये त्यांनी श्री. गजानन पकमोडे आपण सपत्नीक आपले कारखेडा, ता.मानोरा जि.वाशिम या गावी राज्यामध्ये सुरु असणाऱ्या संचारबंदीचे काळात दोघांनी मोठया कष्टाने अंगणातच कोणत्याही यंत्रणांचा वापर न करता २१ दिवसात विहिर खुदाई केल्याची बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून मला समजली वारंवार जाणवणाऱ्या पाणी टंचाईला सामोरे जाण्याकरीता आपणांकडून झालेले हे काम कौतुकास्पद असून इतरांसाठी आदर्शवत असे आहे.आपल्यासारख्या सामान्य कुटुंबाने केलेले हे काम, घेतलेले कष्ट निश्चितच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवी दिशा देणारे असून वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून मी आपले मन:पूर्वक अभिनंदन करुन आपल्या सुखी जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा देतो असे म्हंटले असून सदरचे पत्र पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी, वाशिम यांचेमार्फत पकमोडे कुटुंबाकडे देणेबाबतची सुचनाही केली आहे.