कोरोना:सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली पाटण शहरातील उपाय योजनांची माहिती.


कोरोना:सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली पाटण शहरातील उपाय योजनांची माहिती.


पाटण : ‘कोरोना’संदर्भात पाटण शहरात शासनाने दिलेल्या सूचनांचे कशा पद्धतीने पालन होत आहे याची पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माहिती घेतली. यावेळी पाटणकर यांनी स्वत: पाटण शहरात फिरून प्रशासनाने केलेल्या उपाययोजना अंमलबजावणी कशाप्रकारे होते याची पहाणी केली. त्याचप्रमाणे कोणत्याही मदतीची आवश्यकता भासली तर थेट संपर्क करा असे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना त्यांनी यावेळी सांगितले.


सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचीन कुंभार व सर्व नगरसेवक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कोराना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.  पाटण शहरामध्ये ‘कोरोना’संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन योग्यप्रकारे होत आहे की नाही तसेच वाढीव कोणत्या मदतीची आवश्यकता आहे का याची चौकशी त्यांनी केली. यानंतर पाटणकर यांनी तातडीने पाटण शहरामध्ये विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नेमकी स्थिती जाणून घेतली. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली. पाटणकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण पाटण शहरामध्ये खबरदारी म्हणून जंतुनाशक औषधांची तिसऱ्यांदा फवारणी करण्यात आली. सोबतच शहरातील कायदा व सुव्यवस्था, अन्न पुरवठा, वाहतूक इत्यादींबाबत देखील सत्यजितसिंह पाटणकर यांनी चौकशी केली. सर्व पाटण शहरातील स्थिती नियंत्रणात असल्याचे संबंधितांनी सांगितले.


मदत लागल्यास थेट संपर्क करा- 


विविध प्रभागांमध्ये काही अडचणी आहेत का, हे पाटणकर यांनी संबंधित नगरसेवकाच्यांकडून जाणून घेतले.  शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर तसे थेट सांगा. मदत लागली तर माझ्याशी तत्काळ संपर्क करा, असे पाटणकर यांनी यावेळी स्पष्ट बजावून सांगितले. पाटण शहरातील प्रशासकीय अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. शिवाय नागरिकांनीही पोलीस कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र सरकार या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे देखील पाटणकर यांनी सांगितले.