कृष्णा हॉस्पिटलमध्ये टाळ्यांच्या गजरात कोरोनामुक्त युवकाला डिस्चार्ज..... कोरोनाशी यशस्वी लढाई केल्याबद्दल सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य..


कृष्णा हॉस्पिटलमध्ये टाळ्यांच्या गजरात कोरोनामुक्त युवकाला डिस्चार्ज..... कोरोनाशी यशस्वी लढाई केल्याबद्दल सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य..



कराड : एकीकडे जगभर कोरोनाचा हाहाकार वाढत असताना कराड तालुक्यात मात्र आज एक दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. कराड तालुक्यात सर्वांत प्रथम तांबवे येथील एक 35 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या रूग्णावर गेले अनेक दिवस कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या रूग्णाचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला आज कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व स्टाफने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या कोरोनामुक्त युवकाचे पुष्पगुच्छ देऊन, कोरोनाशी यशस्वी लढाई केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.


          तांबवे येथील एका 35 वर्षीय युवकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कराड तालुक्यात तांबवे येथे हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या युवकावर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष कक्षात उपचार सुरू होते. आज जवळपास 15 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर या युवकाचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.


          त्याच्यावर उपचार करणारे कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य पॅरामेडिकल स्टाफने टाळ्यांच्या गजरात कराड तालुक्यातील या पहिल्या कोरोनामुक्त युवकाचे अभिनंदन केले. कोरोनाची लढाई यशस्वीपणे लढाल्याबद्दल या युवकाला डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर यांच्यासह डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.


          यावेळी बोलताना कोरानामुक्तीची लढाई यशस्वीपणे लढलेला हा युवक म्हणाला, की मी ज्यावेळी येथे आलो त्यावेळी मला खूपच अशक्तपणा आला होता. अशावेळी मला कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी धीर दिला आणि माझ्यावर यशस्वीपणे उपचार केले. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. सुरेशबाबा आणि इथल्या सर्वच डॉक्टर्सनी दिलेल्या उर्जेच्या बळावरच मी आज घरी चाललोय. याबद्दल मी सर्व डॉक्टर्स व स्टाफला धन्यवाद देतो आणि भविष्यात कोरोनाविरूद्धच्या लढाईत मी नेहमीच अग्रभागी राहिन, अशी ग्वाही देतो.


कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटलसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून, उर्वरित 2 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णही याच पद्धतीने पूर्णपणे बरे करण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ प्रयत्नरत आहे. कोरोनावर योग्य उपचाराने मात करता येते, हे या कोरोनामुक्त युवकाच्या रूपाने सिद्ध झाल्याने नागरिकांनी कोरोनाला भिऊन न जाता, फिजीकल डिस्टन्सिंग, मास्क व हॅन्ड सॅनिटायझरचा योग्य वापर या बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले.


 कराड तालुक्यातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आज कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतत असल्याने त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स आणि अन्य अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत होते. एक मोठी लढाई जिंकल्याचे समाधान हे सर्व कर्मचारी व्यक्त करत होते. तसेच कोरोनाचा पराभव करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा संदेश देतानाही हे सर्व कर्मचारी आणि कृष्णा हॉस्पिटल प्रशासन दिसत होते.