सामाजिक बांधिलकी जोपासण्यात जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर....आ. शिवेंद्रसिंहराजे; रेशन कार्ड नसलेल्या ५२० कुटुंबांना अन्नधान्य वाटप 


सामाजिक बांधिलकी जोपासण्यात जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर....आ. शिवेंद्रसिंहराजे; रेशन कार्ड नसलेल्या ५२० कुटुंबांना अन्नधान्य वाटप 


सातारा-  कोरोना सारख्या महाभयंकर महामारीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनामुळे हाहाकार उडालेला असून कोरोनाला हरवण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असलेले, रोजंदारी आणि मजुरी करणाऱ्या गोरगरीब लोकांवर उपासमारीची गंभीर परिस्थिती ओढवली आहे. अशा लोकांना शासनाकडून रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे मात्र, रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांचे काय, असा प्रश्न निर्माण झालेला असताना अशा कुटुंबांसाठी जिल्हा बँक धावून आली आहे. जावली तालुक्यातील रेशन कार्ड नसणाऱ्या ५२० कुटुंबांना जिल्हा बँकेमार्फत अन्नधान्य किट देण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.  


कोरोना साथीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी चालू ठेवली आहे. येत्या ३ मे ला लॉक डाऊनची मुदत संपणार असून हि बाब कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी खूपच महत्वाची आहे. दरम्यान, लॉक डाऊनमध्ये गर्दी टाळण्यासाठी दवाखाने, मेडिकल, किराणा, दूध आणि भाजीपाला विक्रीची दुकाने वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे इतर सर्व दुकाने, रोजंदारी व मजुरीची साधने बंद असल्याने मजूर, रोजंदारी करणारे व हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाने रेशनवर मोफत आणि अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. असे असले तरी काही कुटुंबांकडे रेशन कार्डच नाही अशा लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या मदतीने जावली तालुक्यातील रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांची यादी जिल्हा बँकेने मागवली होती. तहसीलदार शरद पाटील यांच्यामार्फत जावली तालुक्यातील २३ गावामधील रेशन कार्ड नसलेल्या ५२० कुटुंबांची यादी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली. 


शुक्रवारी सकाळी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, तज्ञ् संचालक वसंतराव मानकुमरे, बँकेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते तेल, तूर डाळ, साखर, आटा, तांदूळ, हळद, जिरे या अन्नधान्याची ५२० पॅकेट्स बँकेच्या विभागीय विकास अधिकारी राजाराम शेलार,  यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. हि पॅकेट्स जावली पंचायत समिती येथे ठेवण्यात आली असून गावनिहाय पॅकेट्सची विभागनी करून तातडीने हि पॅकेट्स यादीनिहाय संबंधित कुटुंबांना घरपोच केली जाणार आहेत. हे काम बँकेचे विकास अधिकारी आणि संबंधित गावाचे ग्रामसेवक यांच्यामार्फत केले जाणार असून तातडीने पॅकेट्स गरजू लोकांच्या घरी पोहचवा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. यावेळी सर्वांनी मास्क परिधान केला होता तसेच शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. 


दरम्यान, पॅकेट्स वाटताना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करा, गर्दी होऊ देऊ नका, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. तसेच सर्वांनी घरीच राहून कोरोनापासून स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी हातभार लावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी जनतेला केले.