श्री दत्तदिगंबर पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी  माजी चेअरमन राजेंद्र गांधी याला अटक 

 



श्री दत्तदिगंबर पतसंस्थेच्या अपहारप्रकरणी 
माजी चेअरमन राजेंद्र गांधी याला अटक 


कोरेगाव : संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री दत्तदिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम परत न करता, अपहार केल्याप्रकरणी माजी चेअरमन राजेंद्र हिरालाल गांधी वय ५९, रा. कोरेगाव याला पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरातून अटक केली. कोरोना व्हारसमुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना, गांधी हा कोरेगावातील घरी आला असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गांधी याला जेरबंद केले. 


याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की संपूर्ण सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या श्री दत्तदिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेतून ठेवीदारांना त्यांच्या मुदत ठेवीच्या रकमेच्या पावत्यांची मुदत संपल्यानंतरही ठेव रक्कम मिळत नव्हत्या. याप्रकरणी कोरेगाव येथील एक ठेवीदार विश्‍वास बर्गे यांनी दि. २६ डिसेंबर २०१७ रोजी फिर्याद दिली होती. त्यानंतर या विषयी ३० पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदविलेले असून, त्यामध्ये साडेतीन कोटी रुपयांच्या ठेवी हडप करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


या गुुन्ह्याचा तपास सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे व पुणे शहर पोलीस आयुक्तालयात बदलून गेलेले दादासाहेब चुडाप्पा यांनी केला होता. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंतराव साबळे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला. राजेंद्र गांधी याने जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे जामीन फेटाळल्यानंतर तो फरार झाला होता. पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन भगवान शिर्के याला दि. १ जानेवारी २०२० रोजी भगवान शिर्के रोजी राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी राजेंद्र गांधी याला अटक करण्यासाठी गुजरातसह पुणे आणि मुंबईमध्ये तपास केला, मात्र तो सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता. 


कोरोना व्हारसमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राजेंद्र गांधी हा कोरेगाव येथे आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंतराव साबळे, हवालदार केशव फरांदे, प्रमोद जाधव, गोपनीय विभागाचे किशोर भोसले, अजय लांडे व रुपाली शिंदे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी नवीन एस. टी. बसस्थानकाजवळ असलेल्या गांधी याच्या घराची झडती घेतली, त्यावेळी एका बंद खोलीमध्ये पोलिसांना सापडून आला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत साबळे तपास करत आहेत.


लेखापरीक्षणातील अपहाराचा गुन्हा रडारवर
शासकीय लेखापरीक्षक श्रीमती राणी घायताडे यांनी श्री दत्तदिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेचे चाचणी लेखापरीक्षण केले आहे. या लेखापरिक्षणामध्ये पतसंस्थेत ३० कोटी ७८ लाख ४७ हजार ३०६ रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीमती घायताडे यांनी दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र गांधी याच्यासह संचालक मंडळ व व्यवस्थापकाच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील अपहार रक्कम व त्याची व्याप्ती लक्षात घेता, सदरहू गुन्हा अधिक तपासासाठी सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तो सध्या रडारवर असून, तपास अंतिम टप्प्यात आला आहे. या गुन्ह्याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.