राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय


राज्यातील पालखी सोहळा प्रमुखांच्या समन्वय समितीची बुधवारी बैठक....आषाढीवारी बाबत होणार निर्णय


पंढरपूर : महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभव असलेल्या आषाढीवारी बाबत शासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहिर केलेला नाही. राज्यातील मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता केवळ तीन आठवडे बाकी राहिले आहेत. 


त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि . ६ मे रोजी राज्यातील मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी दिली. यापूर्वी 3 मे रोजी ही बैठक होणार होती ती रद्द करण्यात आल्याने 6 मे रोजी घेतली जाणार आहे.


संत मुक्ताबाईंचा अंतर्धान समाधी सोहळा १७ मे रोजी आहे तर आषाढी वारीचा प्रस्थान सोहळा हा २७ मे रोजी आहे . संत मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याला दरवर्षी पंढरपूरहून श्री विठ्ठलाच्या व संत नामदेव महाराजांच्या तसेच त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ व कौडण्यपुरहून माता रुक्मिणी यांच्या पादुका येतात . हा सोहळा मोठा असतो . खान्देश , विदर्भासह मध्यप्रदेश राज्यातील असंख्य दिंड्या वैशाख शुध्द पोर्णिमेला म्हणजे गुरुवार दि . ७ मे रोजी समाधी सोहळा व आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुक्ताईनगरकडे पायी वारीने मार्गस्थ होतात . दि . १६ मे रोजी या दिंड्या मुक्ताईनगरला पोहोचतात . हा लाखोंचा वारकरी समाज रस्त्यावर आल्यावर त्यांना रोखणे कठीण जाणार आहे. वारकरी समाज सहिष्णू आहे. त्याचा अंत शासनाने पाहू नये व आपला निर्णय लवकर जाहिर करावा. 


ॲड पाटील पुढे म्हणाले, शासनाने आषाढी वारीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आषाढी वारी होणार की नाही, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे दरवाजे उघडणार की नाही याबाबत वारकरी सांप्रदायामध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर होणे गरजेचे आहे. शासनाचे या आषाढी वारीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत निवृत्तीनाथ , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई , संत एकनाथ व संत नामदेव या मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांची तसेच संस्थानचे अध्यक्ष , दिंडी समाजाचे अध्यक्ष , फडकरी संघटनेचे प्रमुख , मानकरी व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख यांची दि . ६ मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बैठक आयोजित केली आहे . या बैठकीत आषाढी वारी संदर्भात निर्णय घेतला जाईल .