कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी श्री हॉस्पिटल समोरील जागा....कराड पालिका विशेष सभेत निर्णय


कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी श्री हॉस्पिटल समोरील जागा....कराड पालिका विशेष सभेत निर्णय


कराड - गतवर्षीच्या महापुरात कुंभार समाजाचे गणेश मूर्ती बनवताना लाख रुपये नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवासाठी शहरातील कुंभार समाजाला मंगळवार पेठेतील श्री हॉस्पिटल समोरील सुमारे एक एकर मोकळी जागा देण्याचा ठराव पालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी करण्यात आला. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या.


कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी कोयना नदीकाठी बालाजी मंदिर समोरचे मैदान देण्यात येत होते. मात्र गतवर्षी महापुरामुळे येथील गणेश मूर्ती तसेच कच्च्या मालाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर संत शिरोमणी गोरोबाकाका समाज मंडळाच्या वतीने नगरपालिकेस पत्र देण्यात आले होते या पत्रात समाजाला दरवर्षी मूर्ती बनवण्यासाठी देण्यात येणारी जागा बदलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत या बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. श्री हॉस्पिटल समोर नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळी जागा आहे. या जागेत कुंभार समाजाला मूर्ती बनवण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.


याबाबतचा ठराव नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी मांडला. त्यास बांधकाम सभापती हनमंत पवार यांनी अनुमोदन दिले. दरम्यान राजेंद्रसिंह यादव यांनी कुंभार समाजाला दिलेल्या जागेतील शेडचा वीजपुरवठा नगरपालिके मार्फत करण्यात येईल, असे सांगितले. या जागेत कुंभार समाजाला शेड,दोन ट्रॅक्‍टर जातील अशा पद्धतीने रस्ता तसेच संपूर्ण जागेचा लेआऊट बनवण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. सदरचे क्षेत्र शांतता झोन असल्यामुळे या जागेत सर्व त्या सूचनांचे पालन करण्यात यावे. कोविड-19 नुसार शासन देईल, ते निर्देश बंधनकारक राहणार आहेत, असे ठरावात नमूद आहे.


 या विषयावरील चर्चेत राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर, नगरसेविका अंजली कुंभार, विनायक पावसकर , हनमंत पवार यांनी भाग घेतला.


कराड शहर व वाढीव भागातील रस्ते विकासासाठी नगरपालिकेने 2011 साली सुमारे 125 कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवला होता. त्याच्या निधी मागणीसाठी सदरचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत हा प्रस्ताव असून शासनाने निर्देश दिल्यानुसार विहित नमुन्यात तो प्रस्ताव दाखल करावयाचा असल्याने त्यास आजच्या सभेत मंजुरी देण्यात आली.


विनायक पावसकर यांनी या अहवालातील सुमारे 50 टक्के रस्ते झालेले असून आपण शासनाची फसवणूक करत आहोत का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राजेंद्रसिंह यादव याने सदरचा प्रस्ताव 2011 सालचा असून आहे तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पुन्हा चर्चेत अनेक कामे घेता येतील, असे सांगितले. पावसकर यांनी याबाबत नगरसेवकांना विश्वासात घेण्यात यावे, असे मत मांडले.


प्रभाग समिती बैठकीस दर वेळी कोणत्या नागरिकांना बोलवणार, याची माहिती नगरसेवकांना अगोदर द्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.