विठुराया...दैन्य सारे संपू दे...घराघरात चैतन्य येऊ दे...आषाढीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी वृक्षारोपण करत घातले साकडे..जयभारत कॉलनीत विठ्ठल-रूक्मिणीच्या नावाने वृक्षराजी फुलणार


विठुराया...दैन्य सारे संपू दे...घराघरात चैतन्य येऊ दे...आषाढीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी वृक्षारोपण करत घातले साकडे..जयभारत कॉलनीत विठ्ठल-रूक्मिणीच्या नावाने वृक्षराजी फुलणार


कराड - आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरीत विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने जमतात. दर्शन घेतात आणि तृप्त होतात. यावर्षी लॉकडाऊनमुळे वारकऱयांना पंढरीत जाता आले नाही. ही रूखरूख प्रत्येकाने अनुभवली. कराडच्या संवेदनशील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी आपल्या जयभारत कॉलनीत विठ्ठल-रूक्मिणीच्या नावाने वृक्षारोपण करत विठुरायाला साकडे घातले. केरोना महामारीचा नायनाट होऊन दैन्य सारे संपू दे, घराघरात चैतन्य पुन्हा नांदू दे, अशी साद विठुरायाला घातली. नगराध्यक्षांच्या या अनोख्या भक्तीचेही कौतुक होत आहे.  


आषाढीला लाखो भक्ताचे दैवत असणाऱया पंढरपुरातील विठ्ठल -रूक्मिणी मंदिर परिसर ओस पडला होता. प्रत्येकाच्या मनात ही रूखरूख होती. तशी नगराध्यक्षांनाही होती. मात्र आपल्याच निवासस्थानाच्या परिसरात विठ्ठल आणि रूक्मिणीच्या नावाने झाडे लावून त्याची जोपासना करण्याची कल्पना त्यांना सुचली. ती त्यांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्षात आणली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जयभारत कॉलनीत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. जयभारत कॉलनीकडे जाणाऱया मुख्य रस्त्याच्या दोन्हीही बाजूस दुतर्फा ही झाडे लावली जाणार आहेत.  


नगरध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या की, गेली हजारो वर्षे वारकरी आपापल्या दिंडय़ा घेवून आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला येत असतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे लाखो वारकऱयांना इच्छा असून देखील पंढरपूरला जाता आले नाही. यासाठी एक झाड विठू माऊलीचे आणि एक झाड रुक्मिणी मातेचे अशा पद्धतीने प्रत्येकाने झाड लावून या झाडांची जोपासना करावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे या संतांच्या शिकवणुकीप्रमाणे प्रत्येक झाडामध्ये विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप पाहावे व त्यांचे संगोपन करावे. ही त्यामागची संकल्पना आहे. शहरात ही योजना राबवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिले. याची सुरूवात आमच्याच कॉलनीतून केली आहे.


यशवंत आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, नगरध्यक्षांनी राबवलेली ही संकल्पना अतिशय स्तुत्य असून संपूर्ण शहरवासियांनी हा उपक्रम राबवावा. आम्ही सर्वजण नगरपरिषदेच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करू. सध्या झाडे लावणे ही काळाची गरज असून शहरातील सोसायटी, प्रभाग यामधील नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. वातावरण शुद्ध व स्वच्छ राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवून मीच माझा रक्षक ही संकल्पना अंगी जोपासली पाहिजे. येथून पुढे पर्यावरणाचा समतोल राखला गेला नाही तर मनुष्यावर, जगावर फार मोठी संकटे ओढवणार आहेत यातून वाचायचे असेल तर निसर्गावर प्रेम केले पाहिजे.  


नियोजन सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती महेश कांबळे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार, फारुकभाई पटवेकर, अतुल शिंदे, घनश्याम पेंढारकर, शिवराज इंगवले, अख्तर आम्बेकरी, नथुराम कुंभार, उद्योजक मुकुंद चरेगावकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे, नितीन वास्के, संभाजीराव मोहिते, चंदुकाका जाधव, सुनील चव्हाण, समाधान चव्हाण, वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी मुज्जफर नदाफ व नागरिक उपस्थित होते.