पुस्तकांच्या मुखपृष्ठावर संदीप डाकवे च्या कलेचा ‘साज’


कराड (राजसत्य) - मुखपृष्ठ हे पुस्तकाचे प्रतिबिंब असते. मुखपृष्ठावरुन पुस्तकाचे अंतरंग समजण्यास मदत होते. एक चित्र हजारो शब्दांचा अर्थ प्रकट करते. अशाच विविध प्रकारच्या पुस्तकांची मुखपृष्ठे करण्याचा चित्रकार संदीप डाकवे यांचा हातखंडा आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार संदीप डाकवे यांना चित्रे रेखाटण्याचा छंद आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध स्पर्धात पारितोषिके पटकावत कलेची चुणूक दाखवली आहे. अनेक शाळांच्या भिंती बोलक्या करण्याचे काम त्यांनी विनामूल्य केले आहे. शब्दातून चित्रे, व्यंगचित्रे, कॅलिग्राफी, रांगोळी अशा विविध माध्यमात ते लिलया काम करतात.


उच्च महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी चित्रकलेचा एटीडी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर संगणकाच्या युगात हाताच्या कलेकडे दुर्लक्ष होवू लागले. तसेच नवीन संगणकाचे ज्ञान घेणे अत्यावश्यक असल्याने त्यांनी ग्राफीक डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. या कोर्सनंतर त्यांच्यातील कला आणि कल्पतेला अविष्काराचे धुमारे फुटले. हाताचे रेखाटन आणि संगणकातील कलाकृती याचा योग्य संगम साधत त्यांनी अनेक कलाकृती अतिशय आकर्षकपणे साकारलेल्या आहेत. आजतागायत त्यांनी सुमारे 30 च्यावरती विविध पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, अहवाल, स्मरणिका इ.ची कल्पक मुखपृष्ठे साकारली आहेत.  त्यांनी मुखपृष्ठे साकारलेल्या पुस्तकांची प्रकाशने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे, अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर व अन्य दिग्गजांनी केली आहेत.


आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे याचा विचार संदीप डाकवे प्रामुख्याने करतात.डाकेवाडीसारख्या दुर्गम भागात राहून आपला वेगळा ठसा उमटवलेल्या संदीपने कलेतून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक संस्थासाठी विनामूल्य पोस्टरर्स, कलाप्रदर्शने राबवली आहेत. त्यांच्या या समाजाभिमुख वृत्तीचे समाजातून नेहमीच कौतुक केले जाते. विविध प्रसंगानुरुप चित्रे, रांगोळी, व्यंगचित्र ते रेखाटतात. संदीप डाकवे यांच्या कलेची दखल वृत्तपत्रातून नेहमी घेतली जाते तसेच टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, ए एम न्यूज यासह स्थानिक चॅनलने देखील घेतली आहे. तसेच त्यांच्या कलेची नोंद इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड या पुस्तकात दोनदा झाली आहे. 


कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून दोनदा तर विविध संस्थांकडून सुमारे 30 पुरस्कारांनी गौरवले आहे. याशिवाय संदीप डाकवे स्थापन केलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टकडून नेहमीच भरीव उपक्रम, स्पर्धा राबवले जातात. कलासंपन्न, सामाजिक जाणिवेचे भान असलेल्या इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार संदीप डाकवे यांच्या कलेचा साज विविध पुस्तकांच्या मुखपृष्ठांची आणि पुस्तकाची उंची वाढवत आहे हे नक्की.