विस्तारित मंत्रिमंडळामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांचा समावेश होणार.......... कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या निष्ठेला न्याय मिळणार !


                             (गोरख तावरे)
आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणारे बाळासाहेब पाटील यांना आता "नामदार" म्हणून काम करण्याची संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.तीस डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून या विस्तारामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्री पदाची संधी देण्याचे सुतोवाच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिले होते ते लवकरच पूर्ण होणार आहे.


आमदार बाळासाहेब पाटील हे सलग पाच वेळा कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून प्रचंड बहुमताने निवडून येत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे पाचव्यांदा निवडून आल्यामुळे ते सध्या आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व मतदारसंघातील जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार बाळासाहेब पाटील सातत्याने जनतेच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आमदार बाळासाहेब पाटील आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बांधिलकी ठेवून आमदार बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारानुसार, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी घालून दिलेल्या सकारात्मक कार्याच्या पाय वाटेने वाटचाल करीत आहेत. 


सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमांमध्ये खासदार शरद पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना "आता या कामाच्या व्यापातून मुक्त करा" असे सूतोवाच केले होते.यामुळे विस्तारित मंत्रिमंडळामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांचा मंत्री म्हणून शपथविधी होणार हे स्पष्ट झाले आहे. खासदार शरद पवार व आमदार बाळासाहेब पाटील यांचा राजकीय व सामाजिक कार्य करण्याचा ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षापासून अबाधित आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाले होते. मात्र आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी विचारसरणीची कास सोडली नाही. इतकेच काय गतकाळात अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार म्हणूनच बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीची पाठराखण केली होती.ग तळामध्ये राष्ट्रवादीला गळती लागली होती या गळती मध्ये आमदार बाळासाहेब पाटील पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. या निष्ठेचे फळ म्हणून आमदार बाळासाहेब पाटील यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाआघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.


शरद पवार यांनी काँग्रेसची फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर तत्कालीन आमदार स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी शरद पवार यांच्या पाठीशी राहणे पसंत केले होते.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून आमदार बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे व खासदार शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ, प्रामाणिक, निष्ठावंत असणारे आमदार म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विस्तारित मंत्रिमंडळामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना संधी देऊन खासदार शरद पवार हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेला न्याय देणार आहेत. कारण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहे.या पक्ष निष्ठेचा विचार करून खासदार शरद पवार हे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी देत आहेत, असे राजकीय निरीक्षकांनी मत व्यक्त केले आहे.