इंदापूरचे महाराणा मंडळ ठरले जयवंतराव भोसले कबड्डी चषकाचे मानकरी


कराड, (राजसत्य) - सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे संयोजक डॉ. विश्‍वास पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील क्रीडामंडळ आणि येडेमच्छिंद्र ग्रामस्थांच्यावतीने आयोजित खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत इंदापूरच्या महाराणा क्रीडा मंडळाने विजेतेपद पटकाविले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते प्रथम विजेत्या संघाला रोख रक्कम व स्व. जयवंतराव भोसले चषक प्रदान करण्यात आला.


स्पर्धेचे उद्घाटन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि ईश्वरपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लिंबाजी पाटील, संग्राम पाटील, डॉ. विश्‍वास पाटील, प्रा. ए. बी. पाटील, विश्‍वास खंडागळे उपस्थित होते.


डॉ. सुरेश भोेसले म्हणाले, की येडेमच्छिंद्र गावातील ग्रामस्थ, संयोजक डॉ. विश्‍वास पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी सलग 19 वर्षे अव्याहतपणे या कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून क्रीडाक्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. कबड्डीसारख्या मैदानी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असून, गावातील क्रीडांगणाच्या डागडुजीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही डॉ. भोसले यांनी दिली.


स्पर्धेत राज्याच्या विविध भागातून सुमारे 32 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी कासेगावचे राजारामबापू व्यायाम मंडळ ठरले. तर कौलव (जि. कोल्हापूर) येथील शिवमुद्रा क्रीडा मंडळाने आणि सातारा येथील सिद्धीविनायक क्रीडा मंडळाने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. याचबरोबर शिवमुद्रा क्रीडा मंडळाच्या कुणाल जाधव याला अष्टपैलू खेळाडू, महाराणा क्रीडा मंडळाच्या समीर शेख याला उत्कृष्ट चढाई, तर राजारामबापू क्रीडा मंडळाच्या नितीन सावंत याला उत्कृष्ट पकडबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.


विजेत्यांना सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व स्व. जयवंतराव भोसले चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील, उद्योगपती प्रमोद पाटील, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, सुरक्षा अधिकारी व्ही. वाय. चव्हाण, संग्राम पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


तानाजी देसाई, काकासो भिसे, भास्कर साबळे, संजय जाधव, दिग्वीजय पाटील, विकास पाटील, संजय जाधव, निवास पाटील यांनी पंच म्हणून, तर आबा रायते, अक्षय घाडगे, आकाश जाधव, संदेश पाटील व अनिकेत पाटील यांनी सहपंच म्हणून काम पाहिले. उदय पेटकर, महेश बेंद्रे यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. तर एन. आर. पाटील व सतीश पाटील यांनी स्पर्धेचे समालोचन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबुराव पाटील, महिपती पाटील, प्रताप पाटील, सर्जेराव टील, शिवाजी पाटील, धनंजय पाटील, विजय पाटील, आबासो यादव, अधिक घाडगे, सुरेश पाटील, रामभाऊ मोहिते, संजय थोरात यांच्यासह गावातील युवावर्गाने परिश्रम घेतले.