कृष्णा हॉस्पिटलचे पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलेच "पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक"....... कॅन्सरग्रस्त रुग्णांवर होणार सर्व उपचार


कृष्णा हॉस्पिटलचे पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलेच "पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक"....... कॅन्सरग्रस्त रुग्णांवर होणार सर्व उपचार


कराड - हजारो कॅन्सरग्रस्त रुग्णांवर गेली 20 वर्षे शस्त्रक्रिया, रेडिएशन, किमोथेरपी इत्यादीद्वारे यशस्वी उपचार करणार्‍या कृष्णा हॉस्पिटलच्या कॅन्सर विभागात ‘पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशाप्रकारचे स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेले हे क्लिनिक’ आजार बळावलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 


कृष्णा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी सुरू करण्यात आलेले ‘पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक’ हे महाराष्ट्रातील 5 मान्यताप्राप्त संस्थांपैकी एक असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलेच क्लिनिक आहे. राष्ट्रीय पॅलिएटीव्ह केअर असोसिएशन व आंतरराष्ट्रीय ए.पी.एच.एन. संस्थेचे सदस्यत्व कृष्णा हॉस्पिटलला प्राप्त असून, महाराष्ट्र सरकारच्या ‘पॅलिएटिव्ह केअर’ पॉलिसीच्या स्थापनेतही कृष्णा हॉस्पिटलचा महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. कृष्णा विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकचे उद्घाटन प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे तर नव्याने स्थापन केलेल्या प्रा. हरमन सैलर अध्यासनाचे उद्घाटन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 


डॉ. आनंद गुडूर यांनी सांगितले, आज कॅन्सर पूर्णपणे बरा होण्याचे  प्रमाण वाढले असले तरी अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण हे आजार बळावलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात. या त्रासातून आराम मिळावा यासाठी ‘पॅलिएटिव्ह केअर क्लिनिक’च्या माध्यमातून वेदनाशामक औषधे, नसांमध्ये औषधे सोडणे, फिजिओथेरपी, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला अशा विशेष आरोग्यसेवा पुरविल्या जाणार आहेत. 


प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. श्रीनिवास गोसला रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. चित्रा खानविलकर यांनी बायोइथिक्स युनिटचा आणि अर्चना कौलगेकर यांनी स्कुल ऑफ ऍडव्हान्स इंटरडिसिप्लिनरी स्टडीज सेंटरचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी डॉ. अरूण रिसबुड, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. एन. डी. शशिकिरण, डॉ. जी. वरदराजुलु, डॉ. वैशाली मोहिते, डॉ. एस. सी. काळे, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. सुनीता टाटा, डॉ. रश्मी गुडूर उपस्थित होते