"बंडातात्या"लाही संपवायचे होते, पंढरपूर हत्याकांडातील आरोपी बाजीराव बुवा कराडकराची खळबळजनक कबुली


ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि ह.भ.प. जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करुन मठाधिपतीपदावर मला खाली खेचले. मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देखील देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या अन जयवंतला संपविण्याचा निर्णय घेतला होता. पण बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले, मात्र जयवंत एकटाच सापडला, अशी खळबळजनक कबुली बाजीराव कराडकर याने पोलीस चौकशीत दिली.


वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीला सन्मानाचे स्थान आहे. या मठाचे तत्कालीन मठाधिपती वैकुंठवासी ह.भ.प. भगवान महाराज कराडकर हे 1958 ते 2009 पर्यत मठाधिपतीपदी कार्यरत होते. त्यांच्या वैकुंठगमनानंतर ह.भ.प. बाजीराव भागवत जगताप उर्फ बाजीरावबुआ गुरुमारुतीबुआ कराडकर (वय 34, रा. कोडोली कराड) यांची मठाधिपती एकमुखाने नियुक्ती करण्यात आली. कराडकर मठाचा मठाधिपती ब्रम्हचारी आणि वारकरी संप्रदायाची रुढी परंपरा जपणारा असावा असा दंडक आहे.


तथापि मठाधिपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर बाजीराव याने मठाधिपतीचे सर्व निर्बंध तोडून भ्रष्ट आचरण करु लागल्याने जेष्ठ मंडळी बाजीराववर नाराज होती. त्यातून त्याला मठाधिपतीपदावर खाली खेचले गेले. आणि ह.भ.प. जयवंत हिंदुराव पिसाळ (वय 33, रा वाळवा जिल्हा सांगली) यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली. या सगळ्या घडामोडीत ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची भूमिका ही माझ्या विरोधात होती असा आरोप बाजीराव याने पोलीस तपासात केला आहे. ह.भ.प. बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातील मोठे प्रस्थ आहे. व्यसनमुक्ती आणि वारकरी प्रश्नांवर बंडातात्या नेहमी आक्रमक भूमिका मांडत. बंडातात्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे बाजीराव नाराज होता.


पोलिसांनी बाजीरावचे मागील पोलीस रेकॉर्ड तपासले असता बाजीरावने याच कारणावरुन कराडमध्ये एका वारकरी सहकाऱ्याच्या डोक्यात वीणा मारली होती. या कृत्यामुळे बाजीराव तीन महिने जेलची हवा खाऊन आला होता. जेलवारी करुन आल्यानंतर देखील त्याच्या वर्तनात कसलाही बदल झालेला नव्हता. "मला पुन्हा मठाधिपती करा" यासाठी त्याचा सतत अट्टाहास सुरु होता. मठाच्या सदस्याकडे जाऊन सतत धमक्या देण्याचे त्याचे सत्र सुरु असल्याने कराड पोलिसांनी बाजीरावला हद्दपार केले होते. या कारवाईमुळे बाजीराव अधिक चिडून होता. काटा काढण्यासाठी तो संधीची वाट पहात होता. सोमवारी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने बंडातात्या कराडकर आणि जयवंत पिसाळ हे दोघेही पंढरपूर मुक्कामी येणार हे बाजीराव जाणून होता.


ही संधी साधून बाजीरावने मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी मागितली. परवानगी देण्यावरुन जयवंत महाराज आणि बाजीराव यांच्यात दशमीच्या दिवशी वाद झाला. पण काही मंडळींनी मध्यस्थी करुन तो मिटवला. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बाजीरावने द्वादशीला दोघांचा काटा काढायचा असा प्लॅन करुन चाकू धार लावून तयार ठेवला.


द्वादशीचा दिवस उजाडला आणि बंडातात्या मठात नसल्याचे बाजीरावच्या लक्षात आले. बंडातात्या नेहमी द्वादशीला पंढरपूर सोडतात यावेळी अचानक गेल्याने बाजीराव अधिकच संतापला होता. दुपारची वेळ पाहून बाजीरावाने जयवंत महाराज यांच्या बरोबर भांडण उकरुन काढले आणि चाकूने जयवंत महाराजांच्या अंगावर सपासप वार केले. हल्ला करत असताना कोणी सोडवायला येऊ नये, यासाठी बाजीरावने खोलीला आतून कडी लावून घेतली होती. चाकू हल्ल्यामुळे रक्तबंबाळ झालेले जयवंत महाराज मदतीसाठी ओरडत होते, पण बाजीरावला जराही दया माया आली नाही. अतिशय निर्घृणपणे बाजीरावने आपल्या सहकाऱ्याची हत्या केली.


चाकूने वार करताना बाजीरावाचे हात देखील चिरले आहेत. पण त्याची पर्वा न करता अतिशय निष्ठूरपणे बाजीरावने सपासप वार केले. या हल्ल्यानंतर जयवंत महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडले. गळ्यातील तुळशीच्या माळा, खोलीतील वीणा, पखवाज, टाळ सारे रक्ताने न्हाहून निघाले. हत्येनंतर बाजीराव पळून जाऊ नये म्हणून लोकांनी खोलीचा दरवाजा बाहेरुन कडी घालून बंद केला आणि पोलिसांना खबर दिली. पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन संशयित आरोपी बाजीरावला हत्यारासह ताब्यात घेतले. आज न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने बाजीरावला पोलीस कोठडी सुनावली आहे.