सत्यकथन करणारी पत्रकारिता असली पाहिजे - खासदार श्रीनिवास पाटील......नवरत्न दर्पण पुरस्काराने खंडू इंगळे यांचा गौरव

कराड - सातारा जिल्ह्यात विविध क्षेत्रातील नवरत्न आहेत. याचा शोध पत्रकारांनी घेऊन त्याचे पुस्तक रूपाने समाजासमोर ठेवावे असे आवाहन करून खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, सुधारककार गोपाळ गणेश आगरकर, यशवंतराव चव्हाण यांनी पत्रकारिता केली आहे. दर्पणाप्रमाणे पत्रकारीता केली आरश्यावर धूळ बसू दिली नाही समोरच्याचा चेहरा दाखविताना आरसा स्वच्छ असला पाहिजे, अशीच भूमिका आजच्या पत्रकारांची असणे आवश्यक आहे. पत्रकारिता ही समाजाला दिशा देणारी असल्यामुळे सत्य कथन करणारी पत्रकारिता असली पाहिजे, सत्य घटनांचे शब्दरूपात बातम्या वृत्तपत्रांमध्ये आली पाहिजे. 


महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने पत्रकार दिन व नवरत्न दर्पण पुरस्कार समारंभ सातारा येथील शाहू कला मंदिरामध्ये संपन्न झाला. यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, मनीषा लोहार उपस्थित होते.


दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक खंडू इंगळे यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. कृष्णाकाठ पत्रकार संघाचे अध्यक्ष, असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ करांचे सचिव, राजमाता प्रतिष्ठानचे सचिव अशा पदांवर सध्या खंडू इंगळे काम करीत आहेत. 1994 ते 1999 पर्यंत वृत्तपत्र घरोघरी टाकण्याचे काम खंडू इंगळे यांनी सुरू केले. त्याचबरोबर वृत्तपत्राची मशीन चालवणे, संपादकीय विभागात बातम्या लिहिणे यासह वृत्तपत्रातील आवश्यक असणारे कामे करून खंडू इंगळे यांनी पत्रकारितेमध्ये आपले योगदान दिले आहे. २००० साली दैनिक कर्मयोगी येथे कार्यरत असणारे खंडू इंगळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारिता सुरू केली‌ सध्या ते दैनिक कर्मयोगीचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन खंडू इंगळे यांना गौरवण्यात आले आहे.