"सह्याद्री" कारखाना निवडणूकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अर्ज.......स्मॉल कमिटी नेमून शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत निर्णय


कराड (गोरख तावरे) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीत आज 22 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अर्जाचा समावेश आहे. 21 संचालकांची निवड करायची असून शुक्रवार दि. 10 जानेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान सह्याद्री कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल असा कयास व्यक्त केला जात आहे.


सर्वसाधारण कराड गट क्रमांक १ - जयवंत पाटील (तांबवे), जयदीप यादव (कडेपुर), जयवंत सावंत (भिकवडी, शामराव उर्फ बाळासाहेब पाटील (कराड), जसराज पाटील (कराड), तळबीड गट क्रमांक 2 - संपत घाडगे (शिवडे), हिंदुराव चव्हाण (शिवडे),कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ - अर्जुन माने (हजारमाची), निवास चव्हाण (कोणेगाव), आनंदराव चव्हाण (कोणेगाव), मसूर गट क्रमांक ५ - प्रल्हाद सूर्यवंशी (हेळगाव) साहेबराव साळुंखे (कवठे), मानसिंगराव जगदाळे (मसूर), विजयसिंह जगदाळे (मसूर ),संतोष घारे (वडगाव), वाठार किरोली गट क्रमांक ६ - शिवाजी घाडगे (बोरगाव), शिवाजी साळुंखे (न्हावी), विठ्ठलराव घोरपडे (तारगाव), दिलीप मोरे (तारगाव), अनुसूचित जाती जमाती गट जयवंत थोरात (हिंगनोळे), पुरुषोत्तम बनसोडे (सुर्ली)


सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती - जमाती, भटक्या विमुक्त जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग यातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत. तर उंब्रज, कोपर्डे हवेली या गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला राखीव गटातून दोन महिला संचालकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे.


सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा अर्ज दाखल


आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी ज्या भूमिकेतून काम केले. त्याचपद्धतीने सह्याद्री कारखाना चालविला जात असून सभासदांचे सहकार्य व संचालक मंडळाचे चांगले काम सुरू आहे.मी अर्ज दाखल केला आहे. अन्य काही उमेदवार अर्ज दाखल करतील, निवडणुकीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


स्मॉल कमिटी नेमून शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत निर्णय 


राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात शेतकरी व कर्जमाफी संबंधाने भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्ज माफीबाबत राज्यात विविध मतप्रवाह आहेत. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, यासाठी स्मॉल कमिटी नेमून निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना दिली.


मयत असणारे कर्जदार शेतकरी संबंधाने काय भूमिका घ्यायची ? कारण शेतकऱ्यांचे कर्ज त्यांच्या मुलाकडे वर्ग केले जाते. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये असल्याचे सांगून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यात सहकाराचे मोठे जाळे आहे. अनेक पतसंस्था आहेत. काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. पतसंस्थांची काही प्रकरणे माझ्यासमोर आल्यानंतर ठेवीदार व संस्थांना दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील असेही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले