कराडच्या पत्रकारितेतील गुरुवर्य, ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांच्या पत्रकारितेची श्रीगणेशा कधी, कुठे, कसा झाला. सतत प्रबोधनात्मक लेखन करणारे मोहन कुलकर्णी आज पत्रकात क्षेत्रातून निवृत्त झाले आहेत.समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाने राज्यस्तरीय सुवर्णपदक संपादकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत होते.आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि समाज सुधारक कै. गोपाळ गणेश आगरकर यांचा वसा व वारसा घेऊन मोहन कुलकर्णी यांनी कराडमध्ये पत्रकारिता केली.ज्येष्ठ पत्रकार मोहन कुलकर्णी यांच्या पत्रकारितेच्या वाटचालसंबंधी यांच्याच लेखणीतून प्रकट झालेला लेख.....
या वर्षी माझ्या पत्रकारितेला पन्नास वर्षे होत आहेत.१९६९ पासून मी दैनिक तरूण भारत. विशाल सह्याद्री.ऐक्य तसेच साप्ताहिक. समर्थ.लालबहाद्दूर. रथचक्र. रसरंग यामधून लेखन सुरू केले.त्या काळात मी ज्येष्ठ पत्रकार श्री वासुदेव देशपांडे यांच्या संगम जाहिरात वितरक या संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो.ही जाहिरात वितरण करणारी संस्था होती.साहजिकच अनेक वृत्तपत्राशी संबंध होता.शिवाय मी माझे लेखन वृत्तपत्राना श्री वासुदेव देशपांडे यांच्या परवानगीने जाहिरातीच्या पाकीटातूनच पाठवत असे.कदाचित त्यामुळे माझ्या लेखनाला अग्रक्रम मिळत गेला असेल.
सततच्या विविधांगी लेखनामुळे साप्ताहिक समर्थचे संपादक श्री अनंतराव कुलकर्णी यानी सातारला बोलाऊन घेतले.आणि त्याच दिवशी समर्थचा सहसंपादक झालो.तिथे असताना दैनिक.ऐक्य.सकाळ.मधून प्रासंगिक लेखन केले.ऐक्य मधून संवादिनी हे सदर लिहू लागलो.चित्रपटावरही लिहू लागलो.सातारचे पाणी सोसले नाही.सतत पोट दुखत असे.क-हाडला परत आलो तसे पुण्याच्या दै.तरूण भारतने प्रतिनिधित्व देऊ केले.त्या दिवसापासून १९९०पर्यंत म्हणजे तरूण भारतचे प्रकाशन चालू असे पर्यंत प्रतिनिधित्व केले.महाराष्ट्र शासनाचा पहिल्या वर्षीचा विकासवार्ता पुरस्कार तरूण भारत मधील ' पाटण तालुक्यातील प्रकाशाची बेटे ' या लेखाला मिळाला.
१९८४मध्ये योगायोगाने दै.लोकसत्ताचे संपादक श्री माधव गडकरी यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या घरी वाई येथे भेट झाली. त्यानी लोकसत्तासाठी काम करशील असे विचारले.नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे लोकसत्ताचे कामासाठी पुण्यात गेलो असताना इंडियन एक्सप्रेसचे निवासी संपादक श्री प्रकाश कर्दळे यांची भेट झाली.ते मला पुणे विद्यापीठात जर्न्यालिझमचे शिक्षण घेत असताना शिकवायला होते.बोलता बोलता त्यानी इंडियन एक्सप्रेसचे काम सोपविले.तरूण भारतचे प्रकाशन बंद झाले आणि अनपेक्षितपणे दै.पुढारीचे तत्कालिन कार्यकारी संपादक श्री.ह.मो.मराठे.
व्यवस्थापक श्री शं.बा.भोसले आणि वृत्तसंपादक बाळासाहेब देशमुख घरी आले.त्यानी पुढारीचे प्रतिनिधित्व करा असा आग्रह धरला.मी विचार करण्यात चार दिवस घालवले.एकदा श्री ह.मो.मराठे यांचा फोन आला.उद्या संपादक श्री बाळासाहेब जाधव याना भेटायला कोल्हापूरला ये.नंतर हवा तो निर्णय घे असे सांगितले. श्री बाळासाहेब याना भेटल्यानंतर मात्र नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.कारण त्यांचे बोलणे एवढे आश्वासक होते की माझ्या पत्रकारितेला इथे नवा आयाम मिळेल.नवे घुमारे फुटतील असे वाटले.आणि घडलेही तसेच.पुढारीचे काम करीत असतानाच महाराष्ट्र पत्रकार निधीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार मिळाला.विशेष म्हणजे त्याच वर्षी पुढारीचे संपादक श्री बाळासाहेब जाधव यांनाही ज्येष्ठ संपादक पुरस्कार मिळाला.
पुढारीने मला कमालिचे स्वातंत्र्य दिले.अनेकानेक संधी दिल्या.बेंगलोरला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला पाठविले.महाबळेश्वरच्या तीन राज्यांच्या मुख्यमंत्री परिषदेला पाठविले.नवीदिल्लीला जागतिक मराठी परिषदेला पाठविले.नाशिकच्या कुंभमेळ्याला पाठविले.मी पुढारीचे काम अक्षरशः झपाटल्या सारखे केले.तिसरी बाजू हे दररोज आणि संवादिनी हे रविवारी अशी दोन सदरे पुढारीत लिहिली.शोध पत्रकारिता करण्याची संधीही पुढारीतच प्राधान्याने मिळाली.इसवीसन दोन हजारला नवे सहस्त्रक सुरू झाले.त्यावेळीच दैनिक कर्मयोगीने व्यवस्थापकीय संपादकपदाचे निमंत्रण श्री नंदकुमार लोखंडे आणि संपादिका मंगल लोखंडे यानी दिले.हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.पण मला कर्मयोगीकडून कसलीच आर्थिक अपेक्षा नव्हती.एक रूपया अशा मुलुखावेगळया मानधनावर मी हे पद स्विकारले.ठरवून पत्रकारितेत आलो तसाच वयाच्या पन्नाशीलाच ठरवले त्याप्रमाणे टप्याटप्याने एकेका वृत्तपत्रातून बाहेर पडलो.पण पत्रकारिता रक्तातच असल्याने वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहितही राहिलो.
एक लक्षात आले का ? समर्थ. तरूण भारत. लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस आणि पुढारी या सर्वांचे प्रतिनिधीत्व आणि कर्मयोगीचे व्यवस्थापकीय संपादकपद चालून आले.मी कुठेही अर्ज केला नाही.ज्यानी त्यानी स्वतःहून विचारणा केली.मी होकार दिला.केवळ जगण्यासाठी आमचे कुटुंब पाटण तालुक्यातील सांगवडहून क-हाडला आले.क-हाडने मला पोटाशी घेतले.मानसन्मान दिला.कौतुक केले.सत्कार केले.क-हाडने माझ्यातला पत्रकार जपला.जोपासला.आणि वाढविला देखील.
पत्रकारितून निर्माण झालेल्या जनसंपर्काचा सुजाण उपयोग करीत मी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहिलो.साहित्य संमेलन.नाट्य संमेलन. लोककला संमेलन. कीर्तन संमेलन. बालकुमार साहित्य संमेलनाच्या आयोजनात सक्रीय पुढाकार घेतला.. दलित साहित्य संमेलन. लेखिका आणि कवयित्री संमेलन प्रीतिसंगम संगीत महोत्सव. बालकुमार संगीत आणि नृत्य महोत्सव. सलग पंचवीस वर्षे गीत गायन नृत्य समूह नृत्य अशा विविध स्पर्धा.आणि शिबिरे यशस्वी झाली ती क-हाडकरांच्या उदार सहकार्यानेच. आणखी एक उल्लेख आवर्जून केला पाहिजे. महाराष्ट्रातील तीसहून अधिक वृत्तपत्रानी माझे प्रासंगिक लेखन प्रसिद्ध केले.साभार परत काहीच आले नाही.तसेच क-हाडमधील सर्व पत्रकार बंधूंनी माझ्या विविध उपक्रमाना. कार्यक्रमाना विस्तृत प्रसिद्धी देऊन माझे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर मोठ्या अभिमानाने नेऊन ठेवले.हे सहकार्य शब्दातीत आहे
श्रीकृष्ण बाल गणेश मंडळ( आजचे श्रीकृष्ण गजानन मंडळ).कला सुगंध साहित्य संघ.चौफेर.कराड जेसिज या संस्थांचे अध्यक्षपद.कराड जिमखाना संस्थेचे उपाध्यक्षपद.रोटरी क्लबचे मानद सदस्यत्व.यूथ होस्टेल असोसिएशन. तेजस ज्ञानदीप मंडळ.युवक बिरादरी. रोटरॅक्ट क्लब. लीओ क्लब अशा संस्थात कार्य करण्याची संधी मिळाली.माझ्या सारख्या घरोघरी वर्तमानपत्रे वाटून शिक्षण घेतलेल्या मुलाला क-हाडने कितीतरी भरभरून दिलंय.देणा-याचे हात हजार .माझीच झोळी दुबळी ठरली.कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर वसलेल्या तिर्थरूप क- हाड नगरीचा. नगरातील प्रत्येक संस्थेचा आणि सर्वच क-हाडकरांचा मी कृतज्ञ आहे. सदैव ऋणी आहे.
मोहन कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार