समप्रमाणात विकास निधी वाटपासाठी मंत्रीमहोदय यांचा प्रयत्न


समप्रमाणात विकास निधी वाटपासाठी मंत्रीमहोदय यांचा प्रयत्न


कराड तालुक्यातील दक्षिण - उत्तर आणि पाटण असे मिळून खऱ्या अर्थाने महाआघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तर मध्ये विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पाटणमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री शंभूराज देसाई लोक प्रतिनिधित्व करीत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे तिन्ही पक्षाचे तीन आमदार गतकाळात येथून निवडून आले आहेत. या तिन्ही लोकप्रतिनिधींचे आपापल्या मतदारसंघावर वर्चस्व आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांची हे पंचवीस वर्षापासून उत्तरमधून निवडून येतात तर शंभूराज देसाई सलग 15 वर्षे या ठिकाणी निवडून येत आहेत. पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि विकासनिधी सर्वाधिक आपल्या मतदारसंघांमध्ये आणून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने तीनही लोकप्रतिनिधी करीत असतात.


पृथ्वीराज चव्हाण दुसऱ्यांदा कराड दक्षिणमधून प्रतिनिधित्व करीत आहेत. गतकाळात यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सध्या पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी आपले योगदान देत आहेत. काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्य प्रदेशातील जाहिरनामा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.अभ्यासू खासदार म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख होत होता. दरम्यान गतकाळात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर स्वच्छ, पारदर्शक मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचा आजही गौरव केला जात आहे.सरळ, प्रामाणिक राजकारण करण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा पिंड असल्यामुळे राजकीय कटुता मनामध्ये ठेवून ते काम करीत नाहीत. माजीमंत्री विलासकाका पाटील यांच्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचे काम पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.दरम्यान भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले हे गेल्या दोन निवडणुकांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना पराजीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर मतदारसंघातील जनता विश्वास व्यक्त करीत आहे.


राज्यमंत्री म्हणून शिवसेनेने शंभूराज देसाई यांना संधी देतानाच त्यांच्याकडे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्यांची जबाबदारी दिली आहे. वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्रीपदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये आघाडी घेतली असून शासनाच्या आणि मिळालेल्या मंत्रीपदाच्या खात्यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये शिवसेनेचे ताकद वाढावी यासाठी राज्य मंत्री शंभूराज देसाई सातत्याने प्रयत्न करीत आहेत ज्या भागात दौऱ्यानिमित्त जातात त्या ठिकाणी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बैठका घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत असतात. २००४ ला शिवसेनेचे आमदारक म्हणून विधानमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरविलेले शंभूराज देसाई यांचा प्रशासकीय तसेच विधानसभेतील कामांचा आमदार तसेच चारवेळा विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे.


आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करीत असतानाच बाळासाहेब पाटील यांना शरद पवार यांनी सहकार व पणन मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत.मंत्री झाल्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आणि विशेष म्हणजे पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील "सह्याद्री"चे अध्यक्ष झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मंत्रीपद असताना "सह्याद्री"चे अध्यक्षपद का स्वीकारले ? याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू असतानाच ज्या सभासद, मतदारांच्या जोरावर इथपर्यंत पल्ला गाठला, मग मंत्रिपद मिळाले म्हणून त्यांच्यांपासून दूर राहणे योग्य नाही अशी मंत्री बाळासाहेब पाटील यांची मनोभूमिका असल्याचे बोलले जात आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असले तरी, बाळासाहेब पाटील यांची नेहमीप्रमाणेच दिनचर्या सुरू आहे. मतदारसंघातील लोकांना भेटणे, विकासकामांचे प्रश्न मार्गी लावले, कोणताही निर्णय घेताना घाई गडबड न करता,पुर्ण विचाराअंती सर्वांचे म्हणणे ऐकून एखाद्या प्रश्नावर निर्णय घेणे,मंत्रिपदाची शाल अंगावर आली म्हणून हुरळून जाणे, असे कोणतेही कृत्य मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून आजपर्यंत झालेले नाही.


जनतेच्या जनहितार्थ कामांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात मंत्री शंभूराज देसाई यांची ओळख आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार करून या संधीचा फायदा करीत पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची भक्कम बांधणी करण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हयाबरोबर पालकत्व असलेल्या वाशिम जिल्हयाच्या विकासासाठी तसेच सातारा जिल्हयाच्या शेजारील सांगली,कोल्हापुर जिल्हयाच्या विकासासाठी जादाचा निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहून वित्त व नियोजन विभागांच्या माध्यमातून या चारही जिल्हयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जादाचा निधी खेचून आणणेकरीता मंत्री शंभूराजे देसाई यशस्वी झाले आहेत. मागील पाच ते दहा वर्षात या चारही जिल्हयाना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी आला नाही त्याहीपेक्षा जादाचा निधी वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून मिळवून दिला आहे.


एकंदरीत सातारा जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री तर शिवसेनेकडे राज्यमंत्रीपद असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याबरोबरच कराड उत्तर - दक्षिण व पाटण तालुक्यांचा विकासासाठी येणारा निधी आणि जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी मंत्री बाळासाहेब पाटील व मंत्री शंभूराज देसाई घेत आहेत. समप्रमाणात सर्वांना विकास निधी मिळावा, यासाठी दोन्ही मंत्री कोणताही दुजाभाव न करता हातात हात घालून काम करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्ते एकत्रितपणे मंत्री महोदयांना आपल्या भागातील विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.