नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार


नगरपालिकेच्या सभेत नगरसेवकांनी प्रशासन व मुख्याधिकार्‍यांना धरले धारेवर...विषयपत्रिकेवरील 90 विषय मंजूर; सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार होणार


कराड - कराड नगरपरिषदेच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या प्रोसेडिंगमध्ये कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमान व सुरक्षा चौकीच्या बांधकामास परवानगी देण्याबाबत विषय घुसावल्याचा आरोप विरोधी गटनेते सौरभ पाटील यांनी नगरपालिका सभेत केला. त्यामुळे या कामास स्थगिती देण्याबरोबरच या प्रकरणातील स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. आजच्या सभेत प्रशासन व मुख्याधिकारी यांना मनमानी करण्यावरून नगरसेवकांनी टार्गेट केले.


कराड नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती विषयपत्रिकेवरील 90 विषय संमत करण्यात आले.आयत्या वेळच्या विषयांमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे होत्या. सभेच्या प्रारंभीच नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी गेल्या सर्वसाधारण सभेचे प्रोसेडींग तयार झालेले नाही. प्रशासन नगरसेवकांना किंमत देत नाही. यापुढे सभेपूर्वी प्रोसेडिंग दिले नाही तर मी स्वतः सभेला उपस्थित राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


याच विषयावर बोलताना विरोधी गटनेते सौरभ पाटील म्हणाले, गतवेळच्या सर्वसाधारण सभेच्या विषयांमध्ये कराड बाजार समितीच्या स्वागत कमान बांधकामाबाबत परवानगी देण्याबाबत कोणताही विषय चर्चेला आला नव्हता. असे असताना प्रोसिडिंगमध्ये हा विषय घुसाडण्यात आला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. ठरावावर स्मिता हुलवान, जयवंत पाटील यांच्या सह्या आहेत. असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. मात्र हुलवान आणि पाटील यांनी याची माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर सौरभ पाटील यांनी हे पाप कोणाचे आहे ? असा प्रश्न मुख्याधिकार्‍यांना विचारला. या ठरावावर नगराध्यक्षांची सही आहे. त्यामुळे नगराध्यक्ष यांनी मुख्य अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा करण्याची सूचना केली. सदरचा विषय स्थगित करण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी यावेळी केली.


मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी यावेळी खुलासा करताना या प्रकरणाची माहिती घेऊन पुढच्या सभेत माहिती देतो असे सांगितले. सौरभ पाटील यांनी सभागृहात ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरु करण्यात यावी अशी सूचना केली. त्याचबरोबर हे होणार नसेल तर पुढच्या वेळेला आम्ही सभागृहात येणार नाही असा इशारा दिला. शहरातील सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला सूचना दिल्यानंतर नगराध्यक्षांनी पुढच्या सभेतपर्यंत या सर्व विषयांवर मुख्याधिकार्‍यांनी कार्यवाही करावी अशी सूचना केली.