क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात "टोल"बाबत नैराश्यजन्य परिस्थिती
(गोरख तावरे)
कराड - "टोल" बाबत कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिक व सर्वपक्षीय नेते जितके संवेदनशील आहेत. तितके सातारा जिल्ह्यातील नागरिक अथवा सर्वपक्षीय नेते संवेदनशील नाहीत असे दिसून येत आहे. क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यातील हे नैराश्यजन्य परिस्थितीमुळे वाहनचालकांना विनाकारण टोल भरून प्रवास करावा लागतो. कराड ते पुणे महामार्गावरील सातारा जिल्ह्या हद्दीतील चौपदरीकरणाच्या रस्त्याला झालेल्या खर्चाची वसुली झाली की नाही ? याबाबत प्रशासन खुलासा करीत नाही. यामुळे आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर विनातक्रार टोल भरावा लागतो.
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलना ईंगा दाखवल्यानंतर टोल प्रशासन झुकले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील एम.एच.१२ आणि एम.एच १४ पासिंगच्या वाहनांना आठदिवस टोल माफ करण्याचा निर्णय झाला. आंदोलनाच्या आक्रमक लढाईत पुणेकर जिंकले. मात्र, सातारा जिल्ह्यातील दोन टोलनाक्याच्या वसुलीबाबत काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टोलबाबत सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येणार का ? पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सर्वपक्षीय नेत्यांच्यात धमक आहे, अशी धमक सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते दाखवणार का ? टोलनाक्याशी सर्वपक्षीय नेत्यांचे काही हितसंबंध आहेत का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कराड - पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्या दिवसापासून आनेवाडी (ता. जावळी) तासवडे (ता. कराड) या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले ते अद्यापपर्यंत. या दोन्ही टोल नाक्यावर यापूर्वी अनेक राडे झाले असून हाणामारी कायमच्याच आहेत. सातारा जिल्ह्यातील वाहनधारक दोन्ही टोलनाक्यावर टोल भरून प्रवास करतात. चौपदरीकरणासाठी झालेला खर्च वसूल झाला की नाही ? हे प्रशासनातर्फे जाहीर होणे अगत्याचे आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अानेवाडी टोलविरोधात आंदोलन केले होते.मात्र जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या एकाही नेत्यांने साथ दिली नाही. परिणामी ठराविक अंतरावर राहणाऱ्या वाहनधारकांना टोल माफ करण्यात आला. वास्तविक सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरून काश्मीर ते कन्याकुमारीचे वाहनधारक प्रवास करतात. महामार्गाची निर्मिती केवळ सातारा जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी करण्यात आलेली नाही. उलट महामार्गसोडून पर्यायी मार्ग प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे कराडवरून सातारा अथवा पुणेला आणि सातारावरून पुणे अथवा कराडला जाणाऱ्या वाहनधारकाला टोल भरूनच प्रवास करावा लागतो.
आनेवाडी व तासवडे टोलनाक्यावर सातारा जिल्ह्यातील सर्वच वाहनधारकांना टोल भरावाच लागतो. सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वाहनधारकांनाटोल माफीची सवलत असायला हवी अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, याविरोधात एकाही राजकीय पक्षाचा नेता अवाक्षर बोलत नाही. यामागचे कारण काय ? असा सवाल आता जनतेने उपस्थित केला आहे. ज्या व्यक्तीकडे चार चाकी वाहन नाही अशा व्यक्तींनी देखील टोलबाबत प्रश्न विचारला पाहिजे. कारण, परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसला टोल द्यावा लागतो. हा आर्थिक भुर्दंड अप्रत्यक्षरीत्या प्रवाशांकडून वसूल होत असतो.