वयाच्या नव्वदीतही दोरीच्या मल्लखांबावर प्रेक्षणीय कसरती करणारे शांतीलाल संघवी


वयाच्या नव्वदीतही दोरीच्या मल्लखांबावर प्रेक्षणीय कसरती करणारे शांतीलाल संघवी


मल्लखांब कसरत करण्याची पारंपरिक मराठमोळी कला जोपासणे आवश्यक आहे. ज्येष्ठ मंडळींनी देखील पुढे यावे. वयाच्या नव्वदीतही दोरीच्या मल्लखांबावर शांतीलाल संघवी आजही विविध कसरती करत आहेत. कोणत्याही देशाच्या जाती-धर्माच्या, वयाच्या स्त्री-पुरुषांना विनामूल्य मल्लखांब शिकविला जातो. तंदुरुस्त जीवनशैलीसाठी मल्लखांब विद्या येणे अत्यावश्यक आहे. यासाठी लोकांनी मल्लखांब विद्या शिकण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. असे आवाहन संस्थेच्यावतीनेही करण्यात आले आहे.


गतवर्षी मुंबईत शिवतीर्थावर श्री समर्थ व्यायाम मंदीरासमोर उभारलेल्या आलिशान वातानुकूलित शामियान्यात आयोजित केलेल्या पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या भव्य उदघाटन समारंभात वयाच्या ८९ व्या वर्षी दोरीच्या मल्लखांबावर अचंबित करणारी प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या शांतीलाल संघवी यांनी आज बरोबर एक वर्षानंतर त्याच ठिकाणी उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा दोरी मल्लखांबावर त्याच कसरती करून विश्व मल्लखांब स्पर्धेत पहिला वर्धापन दिन त्याच उत्साहात साजरा केला. 


समर्थचे लहान-मोठे विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक, पत्रकार व काही वाहिन्यांचे प्रतिनिधी शांतीलाल संघवी यांना प्रोत्साहन देण्यास आवर्जून उपस्थित होते. ‘मल्लखांब फक्त लहान मुलंच करू शकतात, मोठ्या वयाच्या माणसांचं ते काम नही’ हा समज शांतीलालजींनी पुन्हा एकदा खोटा पाडला. त्यांनी स्वत: श्री समर्थ व्यायाम मंदीरात वयाच्या ८२ व्या वर्षी मल्लखांब शिकण्यास सुरुवात केली व समर्थच्या अनेक वासंतिक शिबिरांमध्ये लहान मुलांच्या बरोबरीने सहभाग घेतला आहे.


एरियल सिल्क, पॅराग्लायडिंग असेही अनेक उपक्रम या वयात केले आहेत. “माझं उदाहरण बघून इतरही ज्येष्ठ मंडळींनी पुढे यावं व ही आपली पारंपरिक एतद्देशीय मराठमोळी कला जोपासावी, हा आपला यामागील हेतू आहे” असं ते सांगतात. ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरात रोज सकाळी ७ ते ८ या वेळात कोणत्याही देशाच्या जाती-धर्माच्या, वयाच्या स्त्री-पुरुषांना विनामूल्य मल्लखांब शिकविला जातो, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा’ असे आवाहन संस्थेच्यावतीनेही करण्यात आले आहे.