नगराध्यक्षांच्या कराड नगरपालिकेतील केबिनला ठोकले टाळे


नगराध्यक्षांच्या कराड नगरपालिकेतील केबिनला ठोकले टाळे


कराड - कराड नगरपालिकेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्या नगरपालिकेतील केबिनला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. भाजपाच्या नगराध्यक्षांना कराड शहरातील समस्यांची सोडवणूक करण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे व घरी बसावे असा इशारा प्रहार  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 


नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत,असा असा आक्षेप घेत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या येथील केबिनला टाळा ठोकला. त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे असा संतप्त पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. आज सकाळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते नगराध्यक्षाना निवेदन देण्यासाठी नगरपालिकेत आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष पालिकेत नव्हत्या. तर भाजपपक्षाच्या कार्यक्रमाला गेल्या असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून लवकर येण्याबाबत टाळाटाळ होत गेल्याने कार्यकर्त्ये संतप्त झाले होते.


प्रहार संघटनेच्यावतीने, शहरातील विविध भागांतील तसेच वाखान परिसरातील महत्वाच्या समस्यां सोडवण्यात याव्यात, यासाठी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्याकरिता म्हणून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते येथील सकाळी 11 वाजणेचे सुमारास आले होते. भाजपाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा गेल्या होत्या.


आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगराध्यक्षा सकाळपासून भाजपाच्या कार्यक्रमात वेस्त होत्या. संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 11 ते 1 वाजेपर्यंत प्रतीक्षा केली मात्र, नगराध्यक्ष आल्याच नाहीत. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी अखेर कुलूप आणून नगराध्यक्षांच्या केबिनला लावले.