महाराष्ट्रात सायबर, क्रीडा विद्यापीठ उभारणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
नवी दिल्ली - वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर विद्यापीठ, पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलिम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रीडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात श्री. सामंत बोलत होते.
या सत्राचा विषय "विद्रोह, दहशतवाद व नक्षलवादाशी संघर्ष - कारणे व आव्हाने” हा होता. या सत्राचे अध्यक्ष ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष डॉ. सुजोय पात्रो होते. यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, आमदार सौरभ भारद्वाज, ब्रह्माकुमारी शिवानी बहन, ब्रह्माकुमारी डॉ. बिन्नी सनी व डॉ. कौल, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी. राव हे उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, भविष्यात आतंकवाद्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार आहे. यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाईल.
विद्यार्थी दशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये राष्ट्रगीत गाण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगीत म्हणतात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय अल्कोहोलरहित व रॅगिंगरहित करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही श्री. सामंत म्हणाले.
एमआयटीने सुरू केलेल्या या छात्र संसदेला राज्य शासनाचा पाठिंबा असून पुढील वर्षापासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये असा उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करणार असल्याची ग्वाही श्री. सामंत यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री. सामंत यांना ‘आदर्श युवा आमदार सन्मान’ने गौरविण्यात आले. मणिपूरचे आमदार के. लिसिया, दिल्लीचे सौरभ भारद्वाज यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.