शेतकऱ्यांच्या दृष्टीने असमाधानकारक अर्थसंकल्प सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया

 शेतकऱ्यांच्या दृष्टीने असमाधानकारक अर्थसंकल्प 
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया


कराड - 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे शेती उत्पन्न दुप्पट करणार अशी यापूर्वीच घोषणा केली आहे. पुन्हा पुन्हा केंद्र सरकार अशी फसवी घोषणा करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काही केले जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला किमान किफाईतशीर‌ दर मिळावा अशी मागणी आहे. याबाबत केंद्र सरकार बोलत नसल्याची प्रतिक्रिया सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.


देशातील 100 शहरांचे स्मार्ट सिटी करण्याची घोषणा यापूर्वीच केंद्र सरकारने केली आहे. त्याचे काय झाले असा ? प्रश्‍न करून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, मुंबईच्या रेल्वे संबंधाने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काहीच दिलेले नाही. त्याचबरोबर देशातील अनेक सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचबरोबर "एलआयसीतील भागीदारी विकणे" हा निर्णय केंद्र सरकार घेत असताना एलआयसी कंपनी कोणाला विकणार ? हे स्पष्ट केले नाही. शेतकऱ्यांनी विश्वासाने सरकारची एलआयसी कंपनी असल्यामुळे ठेवी ठेवल्या आहेत मात्र एलआयसी कोणत्या उद्योगपतीच्या घशात तर घालणार नाही ना ? अशी शंका निर्माण होत असल्याची प्रतिक्रियाही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे.


देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर सरकार बोलत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालाला किफाईतशीर दर मिळावा या मागणीवर चर्चा केली जात नसून दुर्लक्ष केले जात आहे. केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक नसल्याची प्रतिक्रिया सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.