समाजात विकृती म्हणून जगू नका प्रकृतीचा घटक म्हणून जगा - दिपज्योती पाटील


विकृती म्हणून जगू नका प्रकृतीचा घटक म्हणून जगा - दिपज्योती पाटील


कराड - शिक्षणाने, विचाराने आपण समृद्ध होतो. आर्थिक श्रीमंतीेपेक्षा शिक्षण हीच खरी श्रीमंती आहे. तिच्या जोरावरच आपण जीवनात यशस्वी होवू शकतो. संस्कार हिच जीवनाची शिदोरी आहे. जीवनात प्रत्येक व्यक्तीने चांगले संस्कार जोपासून आदर्श नागरीक होण्याचा प्रयत्न करा. तरच जीवन समृद्ध होईल असे मत कराडच्या पोलीस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांनी व्यक्त केले.


घोगाव (ता.कराड) येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य स्वानंद कुलकर्णी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य स्वानंद कुलकर्णी यांनी दिपज्योती पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.


विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासून संस्कारक्षम असले पाहीजे. एक आदर्श नागरिक बनले पाहीजे. ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असावी. आपल्याकडून इतरांना त्रास देणार नाही असे आपले वर्तन असावे. आपल्याकडून कोणताही गुन्हा घडणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी. कायद्याने मुलींना खूप संरक्षण देण्यात आले आहे. मुलींनी निर्भयपणे राहीले पाहिजे. कायदे खूप कडक झाले आहेत. गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळते. सोशल मीडिया, वॉटस्अप, स्टेट्स यावर पोलिसांची करडी नजर आहे. सवार्ंनी संस्कारक्षम व आदर्शवादी राहीले पाहीजे असेही दिपज्योती पाटील भाषणात म्हणाल्या.


प्रास्ताविक मेघा काळे यांनी केले तर शितल सुतार यांनी आभार मानले. एनटीए मार्फत घेण्यात येणार्‍या या परीक्षेत विद्यार्थिनी उत्कर्षा परीट, ंऋतुजा यादव, रोहन सूर्यवंशी, प्रफुल्ल कोळेकर यांनी विशेष यश संपादन केले.याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, सागर पाटील  यांनी अभिनंदन केले.