शाहिरांनी नवोदित शाहिर तयार करून कला जिवंत ठेवावी.......शाहिरांच्या मानधनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - मंत्री बाळासाहेब पाटील 


शाहिरांनी नवोदित शाहिर तयार करून कला जिवंत ठेवावी.......शाहिरांच्या मानधनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - मंत्री बाळासाहेब पाटील 


कराड - 53 वर्षापासून कवठे गावातील भेदिक मंडळाने शाहिरी कला जिवंत ठेवली असून ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.  लोप पावत चाललेली कला वयोवृद्ध शाहिरांनी नवोदित शाहीर तयार करून त्यांच्या रुपाने कला जिवंत ठेवावी. शाहिरांच्या मानधनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सहकार, पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.                              


कवठे - मसुर (ता. कराड) येथे प्रतिवर्षाप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कलगी- तुरा भेदिक शाहीरी संमेलन, कविराज हैबती महाराज पुरस्कार वितरण व नवनिर्वाचितांचा सत्कार समारंभ अशा कार्यक्रमात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शाहीर विठ्ठल टिपुगडे होते. यावेळी सातारा जि. प. चे शिक्षण व अर्थ सभापती मानसिंग जगदाळे, राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, गंगाधर जाधव, सरपंच लालासाहेब पाटील, शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब साळुंखे, तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव यादव, ग्रा.पं. सदस्य अधिक यादव, भेदीक मंडळाचे अध्यक्ष शाहीर डी. जी. कळसकर, कवठेचे उपसरपंच रवींद्र साळुंखे,शामराव पाटील, शशिकांत यादव उपस्थित होते.


यावेळी बाळासाहेब पाटील यांची सहकार, पणनमंत्री तसेच सह्याद्रिच्या चेअरमनपदी निवड, मानसिंग जगदाळे यांची जि. प. शिक्षण,अर्थ सभापती व "सह्याद्री"चे संचालक, कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डीगेवाडी (ता. पाटण) येथील शाहिर बंडू पांडू कवर यांना यावर्षीचा  कविराज हैबती महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहिरी संमेलनाची सुरुवात बलुते समाज मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलराव सुतार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. 


यावेळी सातारा ,सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील भेदीक शाहिरांनी कलगी- तुरा  कला सादर केली. प्रास्ताविक सरपंच लालासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जगन्नाथ कुंभार, संजय कुंभार यांनी केले, आभार दिलीप माने यांनी मानले.