सातारा जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन व्हावे.....शिवभक्त व पर्यटकांची मागणी


सातारा जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन व्हावे.....शिवभक्त व पर्यटकांची मागणी


सातारा जिल्ह्यातील जवळपास 25 किल्ले मराठ्यांच्या इतिहासाच साक्षीदार असून यातील काही किल्ले संरक्षित आहेत तर काही असंरक्षित असल्याची नोंद पुरातत्त्व विभागात आहे. सातारा जिल्ह्यातील या ऐतिहासिक स्मारकांचे जतन झाले पाहिजे. अशी शिवप्रेमींची मागणी आहे. दरम्यान महाराष्ट्रात बहुसंख्य शिवप्रेमी असल्यामुळे काही गडांवर मावळे स्वखर्चाने, लोकवर्गणी गोळा करून दुरुस्तीची कामे करीत आहेत.

गडकोट किल्ले हे तर छ. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदारच. त्यांच्या पदस्पर्शाने पावन असणारे किल्ले सातारा जिल्ह्यात आहेत. दरम्यान अनेक किल्ले दुर्लक्षित झाले असून त्याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने राज्यातील गडकोट दुरुस्त करण्यासाठी निधीही मंजूर केला होता, या निधीतून या किल्ल्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.पुरातत्व खात्याने सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गडाचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो शासनाला सादर करावा आणि निधी प्राप्त करून दुरुस्ती करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

सातारा जिल्ह्यातील शिवकालीन गडकोट किल्ले आहेत.याच गड-किल्ल्यांवर इतिहास घडला. आजही या ऐतिहासिक इतिहासाच्या पाऊल खुणा गडावर आहेत. त्या लुप्त होण्यापूर्वीच त्याचे जतन करणे आवश्यक आहे. तालुकानिहाय असणारे गडांची नावे - पांडवगड, केंजळगड, कमळगड, वैराटगड, चंदनगड (ता. वाई), सुभानमंगल गड (ता. खंडाळा), नांदगिरी - कल्याणगड (ता. कोरेगाव) वर्धनगड, भूषणगड , (ता. खटाव) महिमानगड, वारुगड (ता. माण), संतोषगड(ता. फलटण) प्रतापगड, (ता. म. श्‍वर)मकरंदगड, महमंडणगड, वासोटा -व्याघ्रगड (ता. जावली) सज्जनगड, अजिंक्यतारा (सातारा) जंगली जयगड, दातेगड (सुंदरगड) भैरवगड, गुणवंतगड(ता. पाटण) वसंतगड, सदाशिवगड,आगाशिवगड (ता. कराड) अशी आहेत जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले.

किल्ल्यांचा अभेद्यपणा, शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान, शत्रूला बराच काळ रोखून ठेवण्याचे सामर्थ्य, त्याचा बेलागपणा, असे सर्व गुण हेरून छ. शिवरायांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतील किल्ल्यांचा चांगला उपयोग करून घेतला. अनेक किल्‍ले शत्रूवर हल्ला करून ताब्यात घेतले. अनेक किल्ल्यांची त्यांनी उभारणी केली. भोरप्याच्या डोंगरावर छ. शिवरायांनी बांधून घेतलेला बुलंद प्रतापगड हे याचेच उदाहरण.

गडकिल्ले पाहून शिवप्रेमी होतात नाराज

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड - किल्ल्यांना भेटी देणार्‍यांची असंख्य संख्या आहे. मात्र, तेथे असणाऱ्या अपुऱ्या सुविधा व गड-किल्ल्यांची झालेले दुरावस्था पाहून शिवप्रेमी नाराज होत आहेत.राज्य शासन गडकिल्ल्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी देत आहे. यासाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष घालून अहवाल शासनाला देऊन निधी प्राप्त करून काम करणे गरजेचे आहे.