कराड जिमखान्याकडून वैभवशाली इतिहासाचे जतन....खा. श्रीनिवास पाटील ; दीप पुरस्काराने डॉ. योगेश कुंभार यांचा गौरव
कराड - कराडला वैभवशाली इतिहासाची परंपरा आहे. संत सखु यांच्यापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत आदर्श व्यक्तिमत्व इतिहासाचे वैभव आहे. हे वैभव जपत स्वर्गीय दिपक शहा यांनी कराडच्या तसेच कराड जिमखान्याच्या वाटचालीत योगदान दिले. हाच वारसा समर्थपणे जपत किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचा गौरव करून कराड जिमखान्याने सर्वांपुढे आदर्श निर्माण केल्याची भावना खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केली.
कराड जिमखान्याकडून स्वर्गीय दीपक शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सद्भाव दिवस साजरा केला जातो. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दीप पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. कराड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांची उपस्थिती होती.
खा श्रीनिवास पाटील म्हणाले, मावळा हा शब्द उच्चारताच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य डोळ्यासमोर उभे राहते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले सदाशिवगड येथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने गडाखालून महत्त्वकांक्षी पाणी योजना साकारत एखाद्या गडावर पाईप लाईनद्वारे पाणी नेण्याचा पहिला मान सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने डॉ. योगेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली मिळवला आहे. किल्ले सदाशिवगड संवर्धनासह कराडकरांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो असे सांगत कराड जिमखाना आणि स्व. दिपक शहा यांच्या कार्याचाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी गौरव केला.
जिमखान्याचे कार्याध्यक्ष श्रीकांत इनामदार, उपाध्यक्ष अनिल शहा, अभिजित घाटगे, दिपक शहा, अरुण पाटील, आनंद पालकर, कराड जिमखान्याचे सर्व सदस्य, गडप्रेमी नागरिकांसह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रारंभी स्व. दिपक शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रंद्धाजली वाहण्यात आली. मानपत्र वाचन शिरीष संभूस यांनी केले. सूत्रसंचालन विवेक ढापरे यांनी केले. तर सुधीर एकांडे यांनी आभार मानले.