युवा पिढीमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई


युवा पिढीमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई


मुंबई -: युवा पिढीमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती  मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ते बोलत होते.  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ही मुलाखत मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडे सात वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


श्री. देसाई यांनी आपल्या मुलाखतीत मराठी भाषा विभागाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे.  यासाठी केंद्राला आवश्यक ती सर्व माहिती कळविली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा  यासाठी शासनाचा पाठपुरावा सुरू आहे.


आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा विभागाने देखील मराठी वाचकांना उपयुक्त ठरेल असे संकेतस्थळ सुरू केले आहेत. मराठीच्या संवर्धानासाठी राबविण्यात येत असलेली  ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना व्यापक स्तरावर राबविली जाणार आहे. राज्यभर ‘पुस्तकांचे गाव’ या योजनेच्या शाखा तयार केल्या जाणार आहेत.


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून विविध विषयांच्या तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करून भाषा, साहित्य, आधुनिक विज्ञान, विविध ज्ञानशाखा इत्यादी  विषयांशी संबंधित मौलिक ग्रंथांची निर्मिती करण्यात येत आहे. इंग्रजी विकिपिडीयावर मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. मराठी भाषेतूनही विकिपिडीयावर विविध प्रकारचे लेखन व्हावे, याकरिता विभागाकडून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेकरीता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.


केंद्र शासनाच्या त्री-भाषा सूत्रानुसार राज्यातील सर्व केंद्रीय कार्यालयांना प्रादेशिक भाषेचा वापर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. राज्यात सर्व माध्यमांच्या पहिली ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत या  अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा केला जाणार आहे. यासोबतच  सर्व शासकिय कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना दिल्या आहेत.त्याचबरोबर नस्तीवरही आवर्जून मराठीतून शेरा लिहावा यासाठीही निर्देश देण्यात आले आहेत, असेही श्री देसाई यांनी आपल्या मुलाखती दरम्यान सांगितले आहे.